
जिह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्यांची धांदल उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरिपाच्या पेरणीसाठी जूनअखेर तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले आहे. जिह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 70 टक्के आहे. आतापर्यंत जिह्यातील 88 हजार 154 शेतकऱयांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, 30 सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
चालूवर्षी मे महिन्यापासून धुवांधार पावसाला सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची धांदल उडाली आहे. पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱयांची लगबग सुरू असून, त्यासाठी त्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे गरजेचे असते. परंतू मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जाचे शून्य टक्के व्याज आकारले जाते. हंगामासाठी जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्जवाटप केले जात आहे.
जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी 1 हजार 148 कोटी 4 लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जूनअखेर जिह्यातील 88 हजार 154 शेतकऱयांना तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टापैकी 70 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पहिल्या अडीच महिन्यांत पूर्ण झाले आहे.
ऊसपिकासाठी सर्वाधिक 50 हजार 384 शेतकऱयांना 445 कोटी 9 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. सोयाबीनसाठी 6 हजार वीस शेतकऱयांना 2 कोटी 16 लाख, डाळिंब 6 हजार 82 शेतकऱयांना 6 कोटी 18 लाख, द्राक्षांसाठी दहा हजार 30 शेतकऱयांना 217 कोटी 97 लाख, कापसासाठी 11 हजार 647 शेतकऱयांना 3 कोटी 96 लाख, याशिवाय इतर पिकांसाठी एक हजार 16 शेतकऱयांना 6 कोटी 82 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले.