
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, कोयना धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत रात्री उशिरा वाढ झाली. कृष्णा नदीने सांगलीत 40 फुटांची इशारा पातळी पुन्हा एकदा ओलांडली. त्यामुळे मगरमच्छ कॉलनीत पाणी घुसू लागले आहे. या परिसरातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. दरम्यान, सायंकाळपासून संथगतीने पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी संथगतीने ओसरू लागली असताना आणि पाणीपातळी 38.7 फुटांवर असताना बुधवारी रात्रीपासून पुन्हा पाणीपातळीत वाढ होऊ लागली. 38 फुटांची पाणीपातळी सकाळपर्यंत 40 फूट सहा इंचावर पोहोचली. सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट, तर धोकापातळी 45 फुटांवर आहे. पुन्हा एकदा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कृष्णाकाठ धास्तावला आहे. नदीकाठच्या मगरमच्छ कॉलनीत पाणी घुसू लागताच, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊन या भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. दरम्यान, कोयना धरणातून 40 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने पुन्हा पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फूट 6 इंचावर दिवसभर स्थिर होती. सायंकाळनंतर ती एक इंचाने कमी झाली होती.
पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. घर, शेतीच्या परिसरातील पाणी कायम असल्याने या नागरिकांना निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळांमध्ये सोय करण्यात आलेली आहे. दरम्यान, आज कोल्हापूर विभागाचे पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी मगरमच्छ कॉलनी परिसरातील परिस्थितीची पाहणी केली.
पूरग्रस्त 104 गावांत चारा छावण्या; जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू
जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या 104 पूरग्रस्त गावांमधील पशुधनासाठी चारा छावणी सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरवठादारांकडून निविदा मागविल्या आहेत. हवामान विभागाने मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. भारतीय हवामान विभागाने सांगली जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. पुरामध्ये कृष्णा, वारणा नदीकाठची 104 गावे बाधित झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात विस्थापित करण्यात आहे आहे. पूर परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने चारा छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पशुखाद्य व पाणी पुरविण्याकरिता सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांच्याकडून चारा आणि मुरघासकरिता दरपत्रके मागविण्यात आली आहेत. संस्थांनी 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एम. बी. गवळी यांनी केले आहे.