शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक बसून मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आज सकाळी वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.
प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय 35), पारसनाथ वनमोरे (वय 40), शाहीराज पारसनाथ वनमोरे (वय 12, सर्व रा. म्हैसाळ) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय 15) हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराज यालाही शॉक लागला. प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला. तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला.
घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. वीजवितरण अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेला. कामात हलगर्जीपणा करणाऱया अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.