‘शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्ते करण्यापूर्वी महापालिकेची उपाययोजनाच तयार नव्हती, तर मग एवढय़ा गडबडीत रस्ता शुभारंभाचा हट्टहास कशासाठी व कोणाला खूश करण्यासाठी केलात?’ असा सवाल करीत, ‘जर अजूनही खड्डय़ांतूनच जावे लागत असेल, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांना फसवले असून, त्यांनी माफी मागावी,’ अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकातून केली आहे.
शासनाने जनतेच्या करांतून मिळणाऱया निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. रस्ते निविदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकर पार पाडून नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित करण्यात आला. मिरजकर तिकटी येथे चार-पाच महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करीत 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांचा शुभारंभ केला. यावेळी कोल्हापूरकरांसाठी दर्जेदार व गुळगुळीत रस्ते देण्याची भीमगर्जना केली होती; पण आजपर्यंत कोल्हापूरकरांचा खड्डय़ांतूनच प्रवास करण्याचा वनवास संपलेला नाही. याला नियोजनशून्य व निक्रिय कोल्हापूर महापालिका प्रशासनाबरोबरच पालकमंत्री जबाबदार आहेत.
त्यामुळे जर रस्ते करण्यापूर्वी महापालिकेची उपाययोजनाच तयार नव्हती, तर मग एवढय़ा गडबडीत शुभारंभाचा हट्टहास कशासाठी व कोणाला खूश करण्यासाठी केला? भविष्यात तुमचे सरकार पडेल आणि तुम्हाला तीमच्या सहकाऱयांकडून, ठेकेदाराकडून मानसन्मान मिळणार नाही, या भीतीपोटी आपण रस्त्याचा तातडीने शुभारंभ केला का? याप्रश्नी पालकमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पवार आणि देवणे यांनी केली आहे. दरम्यान, निक्रिय व नियोजनशून्य प्रशासन आणि सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने लवकरच ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्यात येईल, असा इशाराही प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.