अजित पवारांचा अपघात संशयास्पद; ब्लॅक बॉक्स जळून गेला हे गंभीर, संजय राऊत यांचे विधान, शहांनी निगेटिव्ह शेरा मारलेल्या ‘त्या’ फाईलचाही उल्लेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांचा अपघात नक्कीच संशयास्पद असून विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून गेला हे गंभीर असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या फाईलवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी निगेटिव्ह शेरा मारला आणि त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली, असेही राऊत म्हणाले.

बारामतीत झालेल्या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे वारंवार संशय व्यक्त करत आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याचे समोर आल्यानंतर रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, अनेक रहस्यमय तथ्य समोर येत असून ब्लॅक बॉक्स जळाला ही गंभीर गोष्ट आहे. इतिहासात अनेक विमान अपघात झाले, पण ब्लॅक बॉक्स जळाल्याचे कधी पाहिले नाही. 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतरही ब्लॅक बॉक्स मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून गेला, हे कसे होऊ शकते? रोहित पवारांनी हा मुद्दा समोर आणला असेल तर हे गंभीर असून या प्रकरणात सरकारचे मनसुबे योग्य नसल्याचे दिसते.

ते पुढे म्हणाले की, रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत. रोहित पवार विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोकांना संशय असेल, सरकारच्या तपासावर विश्वास नसेल आणि त्यांनी स्वतंत्र एजन्सीमार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पद होतो आणि कुटुंबाचा सरकार, तपास यंत्रणावर विश्वास नाही.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? पोस्टरबाजीवरून संजय राऊत यांचा भाजप, शिंदे गटावर निशाणा

अजित पवार यांच्या ज्या फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल त्यांच्या मृत्युपूर्वी पुन्हा उघडण्यात आली होती. खासकरून जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाची फाईल क्लोज करण्यासाठी अमित शहांकडे गेली, पण त्यांनी त्याच्यावर ‘ही फाईल क्लोज करू नये’ असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपबरोबर गेले, ते कारण संपलेच नाही. त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो पुनर्विचार सुरू केला, तिथून या सर्व रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली, असेही राऊत म्हणाले.

अमित शहांना ती फाईल बंद करण्यास नकार दिला. या प्रकरणात जरंडेश्वर साखर कारखान्याची संपत्तीही जप्त करण्यात आली होती. ती फाईल अचानक उघडण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी चौकशी थांबवू नये, फाईल क्लोज करू नये अशा प्रकारचा शेरा मारून ती फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांपासून दादा विरुद्ध भाजप सुरू झाले. ज्या कारणासाठी मी आलो तेच मिळत नसेल तर इथे थांबायचे कशाकरता? त्यातून विलीनीकरणावर आणि एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाल्या, असेही राऊत म्हणाले.