हिंदू-मुस्लिम वादाशिवाय लढलेली एक तरी निवडणूक दाखवा, 11 लाख रुपये घेऊन जा’; संजय राऊतांचे फडणवीसांना थेट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नागरी सुविधांच्या मुद्द्यावर लढल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप जाणीवपूर्वक हिंदू-मुसलमान असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ज्या निवडणुकीत भाजपने हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला नाही, अशी एक तरी निवडणूक फडणवीसांनी दाखवून द्यावी, असे आव्हान देत संजय राऊत यांनी 10 लाख रुपयांच्या इनामाची भर टाकली आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान देत, तसे केल्यास बक्षीस जाहीर केले होते. याला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, भाजपने हिंदू-मुस्लिम वाद न लावता लढलेली एक निवडणूक दाखवावी, मी त्यांना 1 लाख रुपये देईन, असे म्हटले होते. याच संदर्भाचा धागा पकडत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 1 लाख रुपयांमध्ये मी पक्षाच्या वतीने 10 लाख रुपये जोडत आहे, असे सांगत राऊत यांनी एकूण 11 लाख रुपयांचे आव्हान फडणवीसांसमोर ठेवले आहे. ही रक्कम फडणवीस कधीही घेऊन जाऊ शकतात आणि ती त्यांच्या पक्षनिधीला देऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई, ठाणे यांसारख्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नागरी सोयीसुविधांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, तिथेही अयोध्या, जय श्रीराम आणि बाबरी यांसारखे विषय आणून भाजप राजकारण करत असल्याची टीका राऊत यांनी केली. मुंबईचा विकास आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने आयुष्यभर संघर्ष केला असून, जर आम्ही विकास केला नसता तर तुम्हाला आज जी मुंबई दिसतेय ती दिसली असती का? तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एकप्रकारे मराठी माणसाचा विकास आहे असे ते म्हणाले. मुंबईतील उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांचा विकास हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू असून, तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबतच सत्तेत होतात ना भाऊसाहेब देवेंद्र भाऊ याची आठवणही त्यांनी करून दिली. काहीही उचलली जीभ लावली टाळ्याला.,महाराष्ट्राची एक थोर परंपरा आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी खोटे बोलू नये, ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत नाही त्या नाही. अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.