
जैन मुनी नयन पद्मसागर यांनी छत्रपती ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजप नेते नितेश राणे यांच्याशी केली आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जैन मुनींचा खरपूस शब्दात समाचार घेतल्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास पुसण्यासाठी मुनी-बाबांना सुपाऱ्या दिल्यात का? असा सवाल संजय राऊत यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
जैन मुनींना मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले उत्तर योग्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मर्द मराठा भाषेत उत्तर दिले आहे, असे संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कुणाबरोबर करताय? ज्यांच्याशी तुलना केली, त्यांना तरी हे मान्य आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, खरे म्हणजे त्या संबंधित मंत्र्यांनी त्याचक्षणी व्यासपीठावर उभे राहून मुनी महाराजांचा विरोध करायला हवा होता. पण शिवरायांशी तुलना केल्याने त्यांना गुदगुल्या झाल्या. इतर कुणाशी तुलना केली असती तर हेच महाशय तडातडा वाटाण्यासारखे उडाले असते.
महाराष्ट्रात काय चालले आहे? महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास पुसण्यासाठी मुनी-बाबांना सुपाऱ्या दिल्यात का? देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती कुठली साजरी करायची? शिवरायांशी तुलना केलेल्या महाशयांची करायची का? असा सवालही संजय राऊत यांनी केला. जर जैन मुनींनी त्यांना (नितेश राणे) छत्रपती म्हणून मान्यता दिली असेल तर मंत्रिमंडळात त्यांना वेगळे आसन ठेवावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्याहीही वर एक आसन त्यांच्यासाठी ठेवावे लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
मुनी हे आता ‘मुनीरभाई’ झालेत! जैन मुनींनी तोंड आवरावे नाहीतर फटके देणार! मनोज जरांगे यांचा इशारा
दरम्यान, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील याबाबत असे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, माझ्या राज्याची राजधानी कोणती हा निर्णय केंद्र सरकार घेत नाही, राज्य घेते. महाराष्ट्राची राजधानी कोणती हा निर्णय राज्य म्हणून आम्ही घेतो. पण आंध्राच्या संदर्भात संसदेत एक विधेयक आले, उद्या मुंबईच्या बाबतीत काही वेडेवाकडे करण्यासाठी विधेयक आणतील किंवा इतर राज्याच्या बाबतीत आणतील. म्हणून सगळ्या राज्यांनी सावध राहिले पाहिजे.


























































