अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मराठी माणसाला मारायलाच निघालेलं आहे, संजय राऊत यांचा घणाघात

लोकं प्रश्न विचारतील या भितीने मिंध्यांनी दरेगावात जाऊन त्यांनी स्वतःला कोंडून ठेवलं, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मराठी माणसाला मरायलाच निघालेलं आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी बांधव आलेले आहेत. आणि त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठी बांधव मुंबईत येत आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांच्याबरोबर भाजपचं सगळं लटांबर होतं. उपमुख्यमंत्री दरे गावात गेले आहेत त्यांचं शेपूटही फिरत होतं. हजारो लोक मुंबईत आंदोलन करत आहेत, आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे. आमची अपेक्षा होती की, देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील आणि जरांगे पाटील यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. आणि ऐन गणेशोत्सवात हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो शांत करतील. जे गृहमंत्री कश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात, त्यासाठी घटनेत बदल करू शकतात ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठीही बदल करू शकतात. ज्यांनी कलम 370 हटवण्याचे श्रेय घेतलं त्यांना हे श्रेय घेता आलं असतं. पण त्यांनी ते केलं नाही. मग त्यांनी मुंबईत येऊन केलं काय? मुंबईत येऊन त्यांनी भाजपच्या लटांबराला सांगितलं की मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे. म्हणजे गुजराती, अमराठी महापौर झाला पाहिजे हे त्यांनी काल सांगितलं. गृहमंत्री लालबागच्या राजाच्या चरणी काय प्रार्थना करतात? तर मुंबईच महापौर हा उपरा होऊ द्या. पण त्यांना मराठी बांधवांकडे जाऊन त्यांचे दुःख विचारण्याचा वेळ नव्हता. ते लालबागच्या राजाला गेले आणि मुंबईत मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि मुंबई आम्हाला गिळू द्या यासाठी त्यांनी प्रार्थना केली. म्हणून ज्या संख्येने मराठी बांधव मुंबईत जमताहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो. ही मराठी ताकद देशाला काय आहे कळू दे. आम्हाला त्यांचा काहीच त्रास नाही. उद्धव ठाकरे यांनी काल तमाम शिवसैनिकांना आवाहन केले आहे की या बांधवांना सुविधा पुरवण्यास सरकार मागे पुढे पाहत आहेत. त्यांच्यासाठी अन्न पाणी निवारा शौचालय जे जे करता येणं शक्य आहे ते केले पाहिजे. अमित शहांनी मराठी माणसांच्या बाबती केला तो अतिशय अमानुष आणि क्रूर आहे. शहांना त्या संदर्भात एखादी बैठक घेता आली असती, ते तोडगा काढून जाऊ शकले असते पण ते गेले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना एवढंच सांगितलं की मुंबईचा महापौर हा भाजपचा आणि पर्यायाने बाहेरचा झाला पाहिजे. हे अतिश दुर्दैवं आहे. आणि त्यांच्यापुढे भाजपचं मराठी लटंबर मागे पुढे फिरत होते. फडणवीस शिंदे हे कसले मराठी माणसं? हे सगळे लोक मराठी माणसांसाठी कलंक आहेत असे संजय राऊत म्हणाले.

तसेच अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मराठी माणसाला मरायलाच निघालेलं आहे. यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असतं. मराठी बांधवांना खतम करायलाच त्यांचं सरकार आलं आहे. हे सरकारमध्ये एकमेकांना खतम करण्याच्या भानगडीत मराठी माणसालाच खतम करायला निघालेले आहेत. अमित शहांच्या मागे शेपटीसारखं फिरताना एकनाथ शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे होती. जो मुंबई गिळायला निघालेला आहे, जो मराठी माणसू संपवायला निघाला आहे, जो मराठी माणसांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही बघायला तयार नाही तुम्ही स्वतःला कसले मराठे समजता? शिवाजी महाराजांच नाव घेऊ नका. खरंतर छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटलांसोबत उपोषणाला बसायला पाहिजे होतं. पण ते भाजपचे हस्तक आहेत. हे सगळे लोक भाजपच्या दबावाखाली आहेत, हे या राज्याचं दुर्दैवं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लोकं प्रश्न विचारतील या भितीने राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या दरेगावात जाऊन त्यांनी स्वतःला कोंडून ठेवलं आहे. काल त्यांनी अमित शहांच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता. पण महत्त्वाच्या क्षणी दरे गावात गेले. काय करतात माहित नाही.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी बाब आहे. दिल्लीत जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते तेव्हा मोदी सरकारने अशाच प्रकारने अनेक शेतकऱ्यांचा बळी दिला होता. त्या पद्धतीने फडणवीस महाराष्ट्रात काम करत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.