मिंधे यांचे थर कोसळले आहेत, त्यांची हंडी फुटणार आणि ते लटकणार असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी कुठल्याही पदावरून कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीची काल जागावाटपावर चर्चा झाली. त्यात मुंबईतल्या जागांवर चर्चा झाली. मुंबईतल्या 99 टक्के जागांवर तीनही पक्षांची सहमती झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार. मुंबई तोडण्याची आणि लचके तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी मुंबई आमच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणूक ही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी त्यावर औषध घ्यावं असेही राऊत म्हणाले.
जागावाटप
संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत समतोल पद्धतीने जागावाटप होईल. काल मुंबईतल्या जागावाटपाचा प्रश्न मिटला आहे. 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल.
हंडी फुटणार
मिंधेंची हंडी फुटणार आहे आणि ते वरती लटकणार आहेत. हंडी फोडता फोडता त्यांना वरती जाता येणार नाही त्यामुळे ते लटकतील आणि खाली पडतील. त्यांचे थर कोसळायला सुरूवात झाली आहे.
मोदींचं अवतारकार्य संपवलं
मोदी देव नाही किंवा कुठलेही अवतार नाहीत. मोदी लोकसभा निवडणुकीमुळे झुकले आहेत. त्यांचे बहुमत गेले आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोदींच अवतारकार्य संपवलं आहे. मोदी आता हे अंधभक्तांसाठी अल्पमतातले देव झाले आहेत.