डिग्री नसली तरी रोजगार देणारा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारण. नरेंद्र मोदी यांच्याकडे डिग्री नाही. त्यावर संसदेत चर्चाही झाली, पण त्यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद असलेल्या पंतप्रधानपदाची नोकरी आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही डिग्री नाही तरीही त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावरची गृहमंत्रीपदाची नोकरी मिळाली आहे, अशी टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केली. राज्याच्या उपराजधानीत आता मशाल पेटली असून ती संपूर्ण विदर्भात पेटेल, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच, विधानसभा निवडणुकीसाठी मशाल घराघरात पोहोचवा, असे आवाहनही संजय राऊत यांनी आज केले.
शिवसेनेच्या वतीने नागपूर महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज हॉटेल रिंजेटा येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी आहे हे अशा रोजगार मेळाव्यांच्या निमित्ताने लक्षात येते. पदवीधर मुले डिग्री घेऊन रांगेत उभी आहेत हे चित्र फार वाईट आहे. एकेकाळी संपूर्ण देशाचे पोट महाराष्ट्र भरत होता. रोजगार मिळत होता. आज महाराष्ट्रातील उद्योग बाजूच्या गुजरातमध्ये नेले जात आहेत, सार्वजनिक उपक्रमाचे मुख्यालय असो वा एअर इंडियासारख्या अनेक कंपन्यांची शासकीय कार्यालये असोत ती परप्रांतात पळविण्याचे पाप केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली. यावर आवाज उठवला तर त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवले जात आहे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र लढणारा आहे, संघर्ष करणारा आहे. त्यामुळे वाकडय़ा नजरेने कोणी आपल्याकडे पाहू शकत नाही, असेही ते म्हणाले.
नोकरी देणारे व्हा
एकही मराठी माणूस मोठा उद्योगपती नाही, त्याने उद्योगात आले पाहिजे आणि त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच संजय राऊत म्हणाले की, आपण नोकरी देणारे झालो पाहिजे, मराठी उद्योजक नोकरी देणारा होईल तेव्हा महाराष्ट्र अधिक प्रगतिपथावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक दीपक कापसे, युवासेनेचे हर्षल काकडे, महिला संघटिका सुरेखा खोब्रागडे, नायक, अपूर्वा पिटूलवार, जयदीप पेंडके आदी उपस्थित होते.
विदर्भात आयटी पार्क उभारा
नितीन गडकरी हे विदर्भाचे नेते आहेत. त्यांनी देशात रस्त्यांचे जाळे उभारल्याने संपूर्ण देश नागपूर आणि विदर्भाशी जोडला गेला. त्याच रस्त्यांवरून विदर्भात उद्योग आले तर तरुणांना नोकऱ्या मिळतील. विदर्भातील देवेंद्र फडणवीस हे मंत्री आहेत, अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. अमरावती, नागपूरमध्ये आयटी पार्क उभारले गेले असते तर येथील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागले नसते.