महाराणी ताराराणी जैन होत्या या वक्तव्यावरुन संजय राऊत यांचा संताप; जैन मुनींसह राज्य सरकारचा घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आचार्य नयन पद्मसागर यांनी “महाराणी ताराराणी जैन होत्या” असे विधान केल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान करण्यात आले, त्याठिकाणी खुद्द एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, इतका मोठा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात असताना त्या वक्तव्यावर साधा ‘ब्र’ देखील काढला नाही, त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात आधी निषेध करायला हवा, अशा शब्दांत राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शहरं जैन संस्कृतीच्या अमलाखाली आणलेली आहेत. सर्वत्र जैन फूड जैन अमुक आता या महाराष्ट्रात जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं. पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही परस्पर जैन ठरवायला लागलात म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे. कुठे गेल्या त्या सर्व मराठा संघटना ? कुठे गेले ते सगळे मराठा अस्मितेचे आमचे सहकारी. ताराराणीविषयी अशाप्रकारची वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करुन चालणार नाही असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीवरही राऊत यांनी निशाणा साधला. ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, मात्र त्यांनी साधा ‘ब्र’ देखिल काढला नाही. कदाचित एकनाथ शिंदे यांना महाराणी ताराराणी माहीत नसतील किंवा त्यांनी ‘ताराबेन’ असे काहीतरी ऐकले असेल, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. पुढे ते म्हणाले शिंदेजी त्या महाराणी ताराराणी आहेत, शूर हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत. शूरवीर आणि राष्ट्रसंरक्षक हे फक्त महाष्ट्रातल्या मातीतच जन्माला आले. आणि ती सगळी अस्सल मराठी माणसं आणि मराठी विरांगना होत्या असे ठणकावून सांगितले.

या सगळया प्रकरणात जैन धर्मगुरु आणि जैन पद्मसागर महाराज यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे का या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, फडणवीसांना वाटत नाही का यात ताराराणीचा अपमान झाला आहे. त्यांना काय वाटतंय? आम्ही का सांगायला पाहिजे. एकनाथ शिंदें, सुनेत्रा पवार, मनोज जरांगे पाटलांना हा अपमान वाटत नाही का? सर्वांना वाटला पाहिजे. तुम्हीच तर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणला ना? मग या मुनीमहाराजांना हे स्वातंत्र्य कुणी दिले? हंबीरराव मोहित्यांची कन्या महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करायचे हा अधिकार दिला कोणी आणि महाराष्ट्र सरकार हे षंढासारखं बघत राहिलं. आता तुमचे मुख्यमंत्री येतील सांगायला संजय राऊत यांचे वक्तव्य हे खपवून घेणार नाही वगैरे. नका घेऊ खपवून मी बोलतोय म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करा. हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एका जैन मुनींनी थेट लोढांचे नाव घेत, एका वादग्रस्त विधानामागे त्यांचाच हात असल्याचा दावा केला आहे या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, मंगलप्रभात लोढांना ताराराणी माहित आहेत का? महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे का ? ताराराणी या स्वराज्यासाठी लढल्या. लोढा टॉवर उभारण्यासाठी लढल्या नव्हत्या. त्यांचा हिंदु मराठा साम्राजासाठी संघर्ष होता असे स्पष्ट केले.