
महायुती सरकारमधील अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात तोडपाणी होत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल स्टोअरच्या परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी लाच घेताना झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी झडप घातली. त्या लिपिकाने झिरवाळांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली.
संजय राऊत म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे. झिरवाळ काय आहेत हे त्यांच्या तालुक्यातील लोकांनाही माहिती आहे. झिरवाळ यांचे कार्यालय हे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सील केले, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मंत्रालयात अशी कारवाई होऊ शकत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालयातील लाचखोरीवर लक्ष होते आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हा ही कारवाई झाली.
नरहरी झिरवाळ यांचे खाते हे सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी संदर्भात आहे. त्या खात्यात किती अनागोंदी आणि अराज माजले होते हे झिरवाळांचे चारित्र्य माहिती असलेल्यांना सांगायची गरज नाही. हे झिरवाळ उपाध्यक्ष असताना पक्षांतर बंदी कायद्या संदर्भातील विषय त्यांच्यासमोर आले होते आणि पडद्यामागे काय घडले हे आम्हाला माहिती आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळा, उद्याने आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीने बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी केला. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. गणेश नाईक कॅबिनेट मंत्री असून ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर त्यांनी नुसती आदळ आपट, आपटा आपट करून चालणार नाही. त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे राऊत म्हणाले.





























































