महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? कृष्णा डोंगरे प्रकरणी संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

शेतकरी नेते कृष्णा केंडे यांनी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तसेच महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना भयंकर अशा खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. हाच प्रकार कृष्णा डोंगरे यांच्याबाबतीत घडला आहे. महाराष्ट्रातील अत्याचारग्रस्त शेतकऱ्याचा आवाज म्हणून मी डोंगरे यांना ओळखतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डोंगरे यांनी अनेकदा निर्भयपणे आंदोलने केली.

तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही म्हणून नाशिकमध्ये कांद्याची होळी करण्याचे मोठे आंदोलन त्यांनी केले.
सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले, कांदा अग्निडाग समारंभासारखे अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून डोंगरे यांनी संघर्ष सुरूच ठेवला.

मात्र पंतप्रधान मोदी हे नाशिक परिसरात आले तेव्हा त्यांच्या सभेत जाऊन कांदाप्रश्नी आंदोलन करण्याचे धाडस डोंगरे यांनी दाखवल्यापासून ते सरकारच्या नजरेत खुपू लागले. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील सभेत आंदोलन करून या शेतकऱ्याने भाजप सरकारची झोप उडवली. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी बलात्काराचे, विनयभंगाचे एक बनावट प्रकरण पोलिसांना हाताशी धरून रचण्यात आले. पोलीस व राजकरण्यांनी एका महिलेस हाताशी धरून डोंगरे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. खोट्या तक्रारीवर डोंगरे यांना कुटुंबासह उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानात भाजपचे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील होते. त्या कारस्थानामुळे डोंगरे यांना घर-कुटुंब सोडून परागंदा व्हावे लागले. भाजपासंबंधित शिक्षण संस्थाचालक व संस्थेत काम करणाऱ्या महिला शिक्षिकेने विनयभंगाची खोटी तक्रार केली. व त्याआधारे डोंगरे यांना अटक करण्याचे कारस्थान रचले. पण पोलिसांचे दुर्दैव असे की, ज्या खोट्या तक्रारीनुसार बलात्कार कांड घडले त्या तारखेला व त्या क्षणी डोंगरे हे घटनास्थळीच नव्हते, तर वणी येथे सप्तशृंगी गडावर धार्मिक कार्यासाठी गेले होते हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाल्याने भाजपचे मंत्री व पोलिसांचा बनाव उघड झाला.

एका शेतकरी आंदोलकाचा आवाज दडपण्यासाठी राज्याचे मंत्री, पोलीस अधिकारी इतक्या खालच्या पातळीवर गेले हे महाराष्ट्राच्या परंपरेला व प्रशासनाला शोभणारे नाही. कृष्णा डोंगरे यांच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व राजकीय नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे कृष्णा डोंगरे यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल होतील किंवा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होईल अशी भीती मला वाटते. हे चित्र महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. लोकशाही व स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. डोंगरे यांच्यावर बलात्कारासारखे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खतम करण्याचे ‘नक्सली’ कट । कारस्थान रचणाऱ्या अतिरेकी शक्तीवर जन सुरक्षा कायद्याने कारवाई करावी.

कृष्णा भगवान डोंगरे (रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नावे लिहिलेला तक्रारीचा अर्ज पुराव्यासह जोडला आहे. सरकारकडे माणुसकी व कायद्याबाबत आदर शिल्लक असेल तर कृष्णा डोंगरे यांना न्याय मिळेल हे पहावे असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.