अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे. पण उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो. खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. त्यांनी काय बोलावे, काय स्टेटमेंट द्यावे यासाठी तुरुंगात फोन जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा किती खाली आणलाय हे यावरून दिसते. स्वत: फडणवीस याला पाठबळ देत आहेत. भाजपकडे प्रवक्ते नाहीत हे माहितीय. त्यामुळे तुरुंगातील लोकांना भाजपने प्रवक्तेपणाची जबाबदारी दिली असून यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलीय, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
एका गुंडाला बाहेर आणले आणि तो देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे सांगतोय. भाजपच्या सगळ्या लोकांनी नार्को टेस्ट करा. गेल्या 10 वर्षात काय कांड केलेत ते समोर येईल. ईडी आणि पोलिसांचा गैरवापर करून अनिल देशमुख, नवाब मलिक, अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्यासह मला अडकवण्यात आले. आज वाझे यांनी जयंत पाटील यांचेही नाव घेतले. आम्हीही तुरुंगातील 10 लोकं उभी करू शकतो, जे फडणवीस, बावनकुळे आणि शहांचे नाव घेतील. अमित शहाही तुरुंगात जाऊनच आले असून भाजपने असेच संत, महात्मे गोळा केलेत. आता यांनाही वाशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून घेतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात डर्टी, गटारी पद्धतीचे राजकारण केले. एका गुंडाच्या, दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेऊ नका असे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी समोर येऊन सांगायला हवे. पण टाळ्या वाजवत आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो आणि फडणवीस या राजकारणाचे सुत्रधार आहेत, असेही राऊत म्हणाले. एक गुंड, दहशतवादी बॉम्ब ठेवतो, त्याला मुंबईतील पोलीस आयुक्त मदत करतात. तो खुनाच्या खटल्यातील आरोपी आहे. भाजप संकटात आला की तो ताबडतोब बाहेर येऊन स्टेटमेंट देतो. भाजपने असे प्रवक्ते नेमले आहेत. त्याच्यामुळे भाजप भविष्यात आज आहे त्यापेक्षा रसातळाला जाणार आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला.
एक गुंड, दहशतवादाचा आरोपी. ज्याला मुंबईतील पोलीस आयुक्त मदत करतात. तो खुनाचा आरोपी आहे. भाजप संकटात आला की तो ताबडतोब बाहेर येऊन स्टेटमेंट देतो. ही तिसरी वेळ आहे. भाजपने असे प्रवक्ते नेमलेले आहेत. त्याच्यामुळे भाजप भविष्यात आज आहे त्याच्यापेक्षा रसातळाला जाणार, असा इशाराही राऊत यांनी दिला.
अनिल देशमुख यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी दहशतवाद्याची मदत घ्यावी लागते हा भाजपचा पराभव आहे. यासाठी तुरुंगातून प्रवक्त्यांना बाहेर आणले गेले. गुंड, टोळ्या, तुरुंगात बंद असणाऱ्यांना बाहेर काढून महाविकास आघाडीच्या नेत्यावर हल्ले केले जातील हे आधीही सांगितले आहे. तुरुंगात फोन जाताहेत, प्रत्येक तुरुंगातील जेलरच्या कार्यालयातील फोनवर त्यांचे बोलणे होत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे तुम्हालाही ऑफर देण्यात आली होती का? असे विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, नक्कीच. या ऑफर संदर्भात राज्यसभेचे तत्कालिन अध्यक्ष व्यकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवले होते. महाविकास आघाडीचे सरकार बनवताय, त्यापासून दूर रहा. अन्यथा तुम्हाला ईडी, सीबीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. हे मी तेव्हाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना कळवले होते. आमच्यावर दबाव टाकला जात होता. पण अनिल देशमुख, मी फुटलो नाही. आमच्यातील मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो कायम ठेवला, असेही राऊत अभिमानाने म्हणाले.