गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत शहांचे चरण धुवून शिदेंनी आशीर्वाद घेतले, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा! – संजय राऊत

महाराष्ट्रात सुरू असलेले पावसाळी अधिवेशन अर्धवट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री अचानक दिल्लीत धाव घेतली होती. दिल्लीत त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर राज्यात सुरू होती. मात्र या दौऱ्याचा तपशील गुलदस्त्यात होता. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक ट्विट केले आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत गुरू अमित शहा यांचे चरण धुवून एकनाथ शिंदे यांनी आशीर्वाद घेतले आणि मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा तपशील थोडक्यात सांगितला. तसेच लवकर बाकीचा तपशीलही जाहीर करू, असेही राऊत यांनी म्हटले.

अधिवेशन सोडून शिंदेंची रातोरात दिल्लीकडे धाव; मिटवामिटवीसाठी गाठीभेटी, पटवापटवी

“गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले. पण दिल्लीत गुरू अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!”, असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. आता राऊत आगामी काळात शहा-शिंदे भेटीबाबत काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मिंधे गटाचीही धाकधूक वाढली आहे.