
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून विधानभवन परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहखात्यावर बोचरी टीका केली आहे. गृहखाते, पोलीस दल, इंटेलिजेंस हे केवळ राजकीय फोडाफोडीत व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली.
महाराष्ट्राच्या विधानभवनात अधिवेशन सुरू असताना बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आहे. त्याच्यामुळे त्यांची कानाकोपरा शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना विधानभवनात कोण बॉम्ब ठेवण्याचे धाडस करेल. कारण इतका महान गृहमंत्री आम्हाला लाभलेला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
गृहमंत्री म्हणून फडणवीस काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी हुकुमशाहीविरुद्ध लढण्यासाठी बॉम्ब बनवले होते. पण आता देशात आणि राज्यात ज्या पद्धतीने हुकुमशाही सुरू आहे आणि विरोधकांना मान वर करूच द्यायची नाही त्यामुळे विरोधक फक्त या गोष्टीचा निषेधच करू शकतात. मात्र अफवा असली तरी तरी विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणे हे राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे, असे राऊत म्हणाले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर विधानभवन परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे कसून तपास सुरू आहे. pic.twitter.com/vhtTdWHQYK
— Saamana Online (@SaamanaOnline) March 12, 2026
विधान भवनाच्या बाजूला हॉटेल ताजवर 26/11 ला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतं इस्रायली इमारत, ट्रायडंट हॉटेलवर हल्ला केला होता. याचा अर्थ मुंबई सुरक्षित नाही, मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचे गृहखाते, पोलीस दल, इंटेलिजेंस हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरले जाते. त्याच्यामुळे गुन्हेगारांचा, दहशतवाद्यांची मानसिकता अशी आहे की इथे आपण काही केले, तर आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचणार नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आणि स्वत: गृहमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असताना अशा प्रकारच्या अफवाही पसरू नयेत, कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी देशाच्या पार्लमेंटवर झालेला हल्ला पाहिला आहे आणि तेव्हाही भाजपचेच सरकार होते, हे दुर्दैवाने सांगावे लागते, असेही राऊत यावेळी म्हणाले.




























































