सप्टेंबरमध्ये 75 वर्षांच्या होणाऱ्या मोदींना संघ सूचना देतोय की आता तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल व देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल! – संजय राऊत

जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. आता यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही परखड भाष्य केले आहे. सप्टेंबरमध्ये 75 वर्षांच्या होणाऱ्या मोदींना संघ सूचना देतोय की आता तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल व देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, असे राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सरसंघचालकांनी केलेल्या विधानाबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याला आठवत असेल की नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले तेव्हा मी या संदर्भात एक रोखठोक लिहिले होते. सरसंघचालक आणि मोदींमध्ये झालेल्या चर्चेचा साधारण सारांश मी त्यात टाकला होता. 75 वर्षे झाल्यावर निवृत्ती पत्करावी आणि सत्तेच्या पदावरून पायउतार व्हावे असा नियम मोदींनी केलेला आहे. याच नियमांतर्गत मोदींनी आपल्या स्वार्थासाठी आणि मार्ग मोकळे करण्यासाठी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक नेत्यांवर जबरदस्तीने निवृत्ती लादली.

आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढीही पिकलेली आहे. त्यांच्या डोक्यावरचे केसही उडालेले आहेत. जगभ्रमन करून झालेले आहे. सर्व सत्तेची सुख भोगलेली आहेत. त्यामुळे 75 वर्षानंतर निवृत्ती हा जो नियम मोदींनीच केला आहे त्याबाबत संघ वारंवार त्यांना सूचना देत आहे. आता तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, असे संघ सुचित करत आहे. कारण नियम सगळ्यांना सारखा हवा. मग आडवाणी असो किंवा अन्य कुणी, असेही राऊत म्हणाले.

मोदी खरेच निवृत्ती घेतील का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, मोदींच्या ‘कथनी आणि करणी’ फरक आहे. मग 15 लाख रुपये खात्यात टाकण्याचे विधान असो किंवा बेरोजगारी कमी करण्याचे विधान असो किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्याचे असो. मोदी बोलतात आणि नंतर विसरून जातात. पण निवृत्तीची बाब देशाची जनता त्यांना विसरू देणार नाही आणि मला विश्वास आहे की सरसंघचालकही त्यांना हे विसरू देणार नाहीत.

Mohan Bhagwat – पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो; सरसंघचालकांचा रोख नेमका कोणाकडे?

हे देशासाठी शुभ संकेत

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सांगितले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, कुणी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. संघाचे नानाजी देशमुख यांनी निवृत्तीनंतर चित्रकूटला उत्तम कार्य केले. अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक व इतर कामे करतात. त्यामुळे कोण काय करणार याची चर्चा करण्याचे कारण नाही. किंबहुना मोदी, शहांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहेत, असेही राऊत म्हणाले.

माझं ठरलंय, शेती आणि… अमित शहा यांनी सांगितला राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान