
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकांच्या तारखा आगामी काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि मनसेने एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव असल्याचे राऊत गुरूवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबाबतही भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले की, महापालिका निवडणुका वेगळ्या लढवाव्यात अशा प्रकारच्या बातम्या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 तारखेला एकत्र मंचावर गेले आणि महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष झाला. त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे भविष्य काय?
इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली. आम्ही एकत्र निवडणुका लढलो आणि आम्हाला चांगले यश मिळाले. पण या निकालानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक होऊ शकली नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली. इंडिया आघाडीचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर, राष्ट्रीय विषयांवर, संसदीय बाबी संदर्भात आहे, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, विधानसभेला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष प्रामुख्याने होते. ही विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी होती. आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आजही महाविकास आघाडी असून कुणीही यातून बाहेर पडलेले नाही. आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक आहोत. महाविकास आघाडीचे निर्णय एकत्र घेतले जातात. आता विषय राहतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, तर त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहे की मविआ किंवा इंडिया आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढतील का? पण त्यासाठी त्यांची स्थापना झालेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्था, खासकरून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधी स्वतंत्र लढावे लागते, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्या कराव्या लागतात. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी म्हणालो की, आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे. जो आपण 5 तारखेला पाहिला असेल. मुंबई महानगर पालिकांसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील. अजून वेळ असून त्यासंदर्भात फार चिंता करण्याचे कारण नाही, असे राऊत म्हणाले.
बाळासाहेबांना अभिवादन
दरम्यान, गुरूपौर्णिमेनिमित्त संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरू होणे नाही. ते फक्त राजकीय नेते नव्हते, तर सगळ्यात आधी एक उत्तम मनुष्य होते. कडवट महाराष्ट्र प्रेमी, देशभक्त होते. व्यंगचित्रकार, पत्रकार आणि जबरदस्त असे फर्डे वक्ते होते. आजही बाळासाहेबांच्या चरणापुढेच आमचे मस्तक झुकते आणि झुकत राहील. त्यांचे स्मरण झाल्याशिवाय आमच्यासारख्यांचा एकही दिवस उजाडत नाही. एक महान व्यक्तीमत्व महाराष्ट्रात जन्माला आले, त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला मार्गदर्शन केले, दिशा दिली आणि त्यातून आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या, असे राऊत म्हणाले.