
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक आहे. निवडणूकीत भाजपने त्याचा वापर करून घेतलाय. त्याच्या पापाचा भाजप सगळ्यात मोठा भागिदार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी खरात प्रकरणावरून भाजपची सालटी काढली.
”कॅप्टन खराच हा भाजपचा प्रचारक होता. निवडणूकीत भाजपने त्याचा वापर करून घेतला. बच्चू कडू त्यांना भेटायला गेले. त्यांना खरात आशिर्वाद देतायत की भाजपचे मंत्री बनून मला भेटायला या. याचा अर्थ असा आहे की त्यांना भाजपविषयी सहानभूती होती. भाजप अशोक खऱात यांना सर्व सहकार्य करत होता. निवडणूक आयोग अशोक खरात त्यांच्या भक्तांवर दबाव आणून भाजपचा प्रचार करत होता. आता जेव्हा तिथे काही वेगळ्या घटना घडल्या. त्या सरकारला वाटल्या की आपल्या विरोधात आहेत त्यानंतर तिथे कारवाई झाली”, असे ते म्हणाले.
”भाजप व संघ परिवाराची बुआ, बाबा यांची संघटना बांधायची अशी निती आहे. तशी त्यांची संघटना आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाला देखील राजकारणात ओढलं आहे. भाजपच या पापाचा सगळ्यात मोठा भागिदार आहे. याचं प्रायश्चित भाजपने घेतलं पाहिजे. तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून विधानसभेत काहीही वाचून दाखवाल त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. यात आपल्या लोकांचा देखील तितकाच वाटा होता हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी निष्पक्ष काम करतायत असं मी म्हणेन”, असे संजय राऊत म्हणाले.
खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी गृहखात्यावर निशाणा साधला. ” महाराष्ट्रात असं कधीही झालेलं नाही. आतापर्यंत महिलांची ओळख गुप्त ठेवली जात होती. जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे होते, पोलीस गृहखात्याच्या अंतर्गत येतं. गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. देशभरात अनेक बलात्काराचे अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.कुणाचेही असे फोटो व्हिडीओ असे उघडपणे समोर आलेले नाहीत. पण यावेळेस नाशिकमध्ये प्रथमच कायद्याच्या बालेकिल्ल्यात त्या महिलांचे फोटो येतायत याची सरकारला लाज वाटली पाहिजे. तेजस्विनी सातपुते यांनी याची चौकशी केली पाहिजे. यामागे काय आहे. कुणाचं डोकं षडयंत्र आहे ते बाहेर आलं पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

























































