अमेरिकेबरोबर हिंदुस्थाननेने केलेला व्यापार करार हीच देशाची बदनामी, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस देशाची बदनामी करतेय, या भाजपच्या आरोपावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”सर्वात आधी नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवावं. प्रेसिडन्ट ट्रम्प यांच्या दबावाखाली अमेरिकेबरोबर हिंदुस्थाने केलेला व्यापार करार ही देशाची बदनामी. ट्रम्प आपल्याला सांगतायत की तेल कुणाकडून खरेदी करायचे, याला सन्मान म्हणायचा की बदनामी म्हणायची?”, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

”नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवावं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं समर्थन करणं थांबवावं. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्यात असती तर इराण इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे बळी गेले ते गेले नसते. या सगळ्याला जबाबदार मोदींचे मालक ट्रम्प आहेत. यावर मोदींनी एक शब्दही काढलेला नाही. प्रेसिडन्ट ट्रम्प यांच्या दबावाखाली मोदींनी ऑपरेशन सिंदूर अचानक मागे घेतले. तसा दबाव या युद्धाच्या बाबतीत मोदींनी ट्रम्प यांच्यावर आणायला हवा होता. या युद्धावर स्पेन, इटली, रशिया, चीन आपलं मत व्यक्त करत आहेत. पण नरेंद्र मोदींकडून कोणतेही मत भूमिका व्यक्त झालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट”, असे संजय राऊत म्हणाले.

”अमेरिकेबरोबर हिंदुस्थानने केलेला व्यापार करार हीच देशाची बदनामी आहे. प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली अमेरिकेने शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या दळभद्री अटी लादल्या आहेत. ट्रम्प आम्हाला सांगतायत की कुणाकडून आम्ही तेल खरेदी करायची. याला सन्मान म्हणायचा की बदनामी म्हणायची. महाराष्ट्राच्या बाबतीतही काही वेगळं घडत नाही. पण आम्ही गप्प आहोत. आजही देशात lpg साठी रांगा लागल्या आहेत. शिर्डीतल्या साई संस्थानात प्रसादाचा एकच लाडू देतायत. कारण गॅस नाही. देवासमोर तरी खोटं बोलू नका. मंदिरातल्या जेवणात दोन चपात्या देत होते त्यात एक चपाती कमी केलीय. देशातल्या सर्व देवस्थानात हीच परिस्थिती आहे. मुंबईत 40 टक्के रेस्टॉरंट बंद आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेलाय. ही महाराष्ट्राची, मुख्यमंत्र्यांची व पंतप्रधानांची बदनामी आहे. हे सगळं जर कुणाला समजत नसेल तर त्यांच्यासमोर डोकं फोडून काय उपयोग”, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

”आपल्या देशात जेव्हा सत्तापालट होईल तेव्हा देशाची ही जी काही लूट, मानहानी, बदनामी झाली आहे त्यासाठी मोदींना जबाबदार धरलं जाईल. जगातल्या संधर्षावर, देशातल्या अस्थिरतेवर, महागईवर बोलत नाही. ते केरळ, तामिनाडू, आसाम, प. बंगालच्या निवडणूकांवर लक्ष देतायत. हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान आहेत”, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी वृत्तपत्रातील एका बातमीचा देखील संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, ”इराणच्या सामुद्रधुनीतून जी जहाजे इंधन घेऊन निघाली आहेत आधी गुजरातला जाणार हे मी आजच्या वृत्तपत्रात वाचलं. तिथे माल उतरवला जाणार मग उरलेला माल देशाला दिली जाणार”, असे ते म्हणाले.

वांगचूक यांनी आरसा दाखवला म्हणून ते देशद्रोही

”सोनम वांगचूक यांचं आम्ही अभिनंदन करतो. रासूका अंतर्गत त्यांना बेकायदेशीररित्या अटक केलेली. ज्याला तुम्ही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, ज्याने निर्माण केलेलं मॉडेल तुम्ही मान्य केलं. त्या व्य्कतीने लडाख संदर्बात सरकारने दिलेली वचनं पूर्ण करावी अशं आवाहन केलं व त्यासाठी लोकांनी आदोलंन केलं तर तो देशद्रोही. हेच वांगचूक तुमचे लाडके होते. मन की बात मध्ये तुम्ही त्यांच्याविषयी सांगितले होते. आता तेच वांगचूक तुम्हाला आरसा दाखवायला लागला म्हणून तो देशद्रोही ठरला. देशातले एकजात सगळ्या भ्रष्टाचारी व देशद्रोह्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे”, असे संजय राऊत म्हणाले