…तर यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही अर्बन नक्षल ठरवलं असतं, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेतेपद न देणं हा लोकशाहीतील सर्वात मोठा नक्षलवाद आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मुंबई विद्यापीठातील भाजपच्या सिनेट सदस्यांनी दीपक पवारांना अर्बन नक्षल म्हटलं. हीच पिलावळ जर 50 वर्षांपूर्वी जन्माला आली असती तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही अर्बन नक्षल ठरवलं असतं असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, इंधनाची टंचाई, गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे. देशभरामध्ये एलपीजीसाठी रांगा लागलेल्या आहेत, हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या मोठ्या शहरातसुद्धा 40 टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परतत आहेत, हे मान्य केलं पाहिजे. अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्येही कपात करण्यात आली आहे. फक्त मोदींच्या नावाने भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन टंचाई आणि युद्ध संपणार नाही आणि एलपीजी गॅसच्या रांगा थांबणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून हे समजून घेतलं पाहिजे.
आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात. ते म्हणतात की आम्ही वातावरण खराब करत आहोत, मोदींची बदनामी करत आहोत. मोदी स्वतःच स्वतःची आणि देशाची बदनामी करत आहेत. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू राज्यातील निवडणुकांच्या प्रचाराला वेळ आहे, पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही.

तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे, त्यासंदर्भात सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. विधानमंडळात चर्चा झाली पाहिजे. आणि त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केली पाहिजे. पण तुम्ही ते काहीच करत नाहीत, फक्त मोदींचे भजन करत आहात. लोकांची अवस्था बघा काय आहे. बाहेर लोक हवालदिल झाले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. “आधी गुजरातला पुरेसं तेल आणि गॅस उतरवला जाईल, मग उरलेला देश मेला तरी चालेल. देशाची जनता रांगेत उभी राहू द्या, पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश विरोधकांच्या छळासाठी आहे,” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

देश पुन्हा एकदा लॉकडाऊनसारख्या परिस्थितीकडे जातो आहे, असं आम्हाला वाटतं. कदाचित देवेंद्र फडणवीसांना असं वाटणार नाही, कारण असं बोलल्याने मोदींची बदनामी होते. आम्ही सत्य सांगितल्यामुळे ते म्हणतात आम्ही मोदींची बदनामी करतो. मग आम्ही नक्षलवादी ठरतो. सत्य बोलतो म्हणून आम्ही अर्बन नक्षलवादी ठरतो. या देशामध्ये गॅस टंचाई आहे, इंधन टंचाई आहे. हॉटेल बंद पडत आहेत, फाउंड्री उद्योग बंद पडतो आहे, इतर उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे रोजंदारीवर असलेला कामगार आपापल्या घरी आणि गावाकडे निघाला आहे – मुंबईच्या बाहेर, शहराच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर. हे सांगणं म्हणजे आम्ही अर्बन नक्षलवादी? आणि ते म्हणजे महात्मे, श्रीरामाचे अवतार आहेत का?

माझ्या माहितीप्रमाणे दीपक पवार यांनी केंद्र सरकारच्या हिंदी भाषा सक्तीविरुद्ध महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला. महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा सक्तीची असावी, मराठी शाळा टिकाव्यात, ही भूमिका जर दीपक पवार यांच्यासारखे सुशिक्षित प्राध्यापक आणि संशोधक घेत असतील आणि त्यांना सिनेटमधील भाजपचे लोक अर्बन नक्षलवादी म्हणत असतील, तर ते महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा दुर्दैव आहे. हीच पिलावळ 50 वर्षांपूर्वी जन्माला आली असती तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही नक्षलवादी ठरवलं असतं. आम्ही मराठीची भूमिका मांडत आहोत, मराठी सक्तीची करा म्हणत आहोत. मग या हिशोबाने ममता बॅनर्जी, स्टालिन, कुसुमाग्रज – सगळे नक्षलवादी ठरतील का? कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं की मराठी भाषा मंत्रालयाच्या पायरीवर भिकाऱ्यासारखी उभी आहे. तुम्ही त्यांचा मराठी भाषा दिन साजरा करता. उद्या त्यांनाही नक्षलवादी ठरवाल का? मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची असावी असं बोलणं म्हणजे नक्षलवाद आहे का?

दीपक पवार सातत्याने मराठी भाषा आणि मराठी संस्था टिकाव्यात यासाठी काम करतात. ते आमचे सहकारी आहेत. एशियाटिक सोसायटीची लढाई असो, मुंबई मराठी साहित्य संघाची लढाई असो किंवा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची लढाई असो – या सगळ्या संस्थांवर काही संघप्रणित लोक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक आम्ही जिंकली. तिथे घुसायचा प्रयत्न झाला होता. मराठी साहित्य संघामध्येही आम्ही त्यांना हटवलं आहे. एशियाटिक सोसायटीची निवडणूक संघवाद्यांनी राजकीय दबाव आणून रद्द करून घेतली, कारण त्यांचा दारुण पराभव निश्चित होता. कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अस्सल मराठी पॅनल उभं केलं. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही संस्था टिकावी आणि विद्वान मराठी माणसांच्या हातात राहावी, यासाठी आमची लढाई आहे. पण संघ प्रवृत्तीच्या काही लोकांना या संस्था त्यांच्या ताब्यात हव्या आहेत. बिल्डरांच्या ताब्यात हव्या आहेत. अमराठी बिल्डर जे मुंबईत माजले आहेत, त्यांच्या ताब्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साहित्य संघ आणि एशियाटिक लायब्ररी द्यायच्या आणि तिथे टॉवर उभे करायचे – एवढाच त्यांचा हेतू आहे. त्यांना मराठीबद्दल अजिबात प्रेम नाही. धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन आणि विधिमंडळात चुकीच्या पद्धतीने विषय मांडून त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणली. हे किती मोठं कारस्थान आहे ते लक्षात घ्या. हा संघछाप नक्षलवाद आहे आणि अत्यंत भयंकर आहे.

महाराष्ट्रात आणि देशात जे चाललं आहे ते पटतंय का? हा प्रश्न प्रत्येक राष्ट्रभक्त आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिकाला पडायला हवा. ज्याला हा प्रश्न पडत नाही, त्याने स्वतःला मराठी किंवा भारतप्रेमी म्हणू नये. राज ठाकरे यांनी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर जो टीजर प्रसिद्ध केलेला आहेत मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे.

बारामती पोटवनिवडणुकीबाबात संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर एकत्रित निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री म्हणतात की निवडणूक बिनविरोध व्हावी. पण ‘विरोध’ हा शब्द महत्त्वाचा आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती का होत नाही? विरोधी पक्षनेतेपद न देणं हा लोकशाहीतील सर्वात मोठा नक्षलवाद आहे. मिस्टर फडणवीस, जर हे तुमच्या नेतृत्वाखाली होत असेल, तर या नव्या नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व तुम्ही करत आहात.

ही काही परराष्ट्रनीती नाही. इराण सरकारची मेहरबानी आहे. इराणने हिंदुस्थानबरोबर असलेले राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध जपत आम्हाला सवलत दिली. त्याबद्दल इराण सरकारचे आभार मानले पाहिजेत. जर परराष्ट्रनीती प्रभावी असती तर मिस्टर मोदी यांनी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यासोबत गुलामीचा करार केला नसता. दोन जहाजे, तीन जहाजे आधी गुजरातमध्ये जातील. तिथे पूर्ण गुजरातला जे हवे ते उतरवतील आणि मग देशाचा विचार केला जाईल. या युद्धात हिंदुस्थानने उघडपणे नाही, पण लपूनछपून अमेरिका आणि इस्रायलला समर्थन दिलं आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो – या निवडणुकांचे निकाल काय असतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकत आहेत. केरळमध्ये काँग्रेस किंवा डावे पक्ष आघाडीवर आहेत. तामिळनाडूत स्टालिन जिंकत आहेत. आसाममध्ये गौरव गोगोई यांनी हेमंत बिस्वा सर्मा यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं पानिपत होणार आहे. महाराष्ट्रातून आणि मुंबईतून कितीही पैशाचे कंटेनर आणि टँकर तिकडे पाठवा, पण त्या राज्यातील जनता विकली जाणार नाही. ती फक्त या राज्यातील जनता विकली जाते असेही संजय राऊत म्हणाले. .