नरेंद्र मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मोदींना जे भाषणं लिहून देत आहेत, ते मोदींची बेअब्रू करत आहेत. म्हणजे काल काय बोलले, त्याचा आज पत्ता नाही. आज काय बोलले उद्या पत्ता नाही. त्यामुळे मोदी महाराष्ट्रात येऊन रोज खोटं बोलतात, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱयावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण घडलं. त्याला संरक्षण देणारी लोकं मिंधे आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्यावर मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले. त्यांच्या व्यासपीठावर संजय राठोड होते. त्यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोप आहे. तिच्या घरातही नशेचे पदार्थ सापडले होते. तिथे या मंत्र्याचे जाणे-येणे होते. तुम्हाला अमली पदार्थांची एवढी चिंता आहे, पण तुमच्या पायाशी कोण बसलं आहे?’, असा सवालही राऊत यांनी केला.
अदानींच्या पोर्टवर ड्रग्ज पकडले त्यावर बोला!
मोदींनी अकोल्यात अमली पदार्थांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. काँग्रेस अमली पदार्थाच्या पैशावर निवडणूक लढतोय असे ते म्हणाले. मग गुजरातमधील अदानींच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले त्यावर मोदी का बोलत नाहीत? अफगाणिस्तानातून येणारे ड्रग्ज उतरवण्यासाठी मुंद्रा पोर्टचीच निवड का केली? यावर मोदींनी बोलावे असे संजय राऊत म्हणाले.