जोपर्यंत नरेंद्र मोदींना पदावरून खाली खेचणार नाही… संजय राऊत यांचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना भटकती आत्मा म्हटले होते. त्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. त्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मोदीजी भटकती आत्मा कुणाचा पाठलाग सोडत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पदावरून खाली खेचणार नाही, तोपर्यंत आमचे आत्मे शांत बसणार नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

भटकती आत्माची गोष्ट महाराष्ट्राच्या प्रचारात खूप चालली होती पण आता केंद्र सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार या ज्या अतृप्त आत्मा आहेत. पहिला मोदींनी त्यांच्या आत्म्यांचे समाधान करायला हवे. नरेंद्र मोदींना सर्वात आधी त्या दोन आत्म्यांची शांती करायला पाहिजे. ज्या प्रकारे मंत्रीमंडळात खाते वाटप झाले आहे. त्यामुळे सर्वच आत्मा अतृप्त आहे. आणि आमचं बोलाल तर भटकती आत्मा कुणाचा पाठलाग सोडत नाही. जोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या पदावरून खाली खेचणार नाही तसेच महाराष्ट्रात सरकार बनवत नाही तोपर्यंत आमचे आत्मे शांत बसणार नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात मजूबत आहे. महाविकास आघाडीची मजबूती काय असेल ते या निवडणूकीत दाखवू व महाराष्ट्रात आम्ही सत्ता स्थापन करू”, असे संजय राऊत म्हणाले.

”मोदींनी गेली दहा वर्ष लोकांना खुळखुळा दिला आहे. पण आता आम्ही मोदींना प्रश्न नाही करणार आ्म्ही चंद्राबाबू नायडू व नितीश कुमारांना प्रश्न विचारू कारण नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनीच पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे त्यांची मेहेरबानी असेल तोपर्यंत हे सरकार राहिलं”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मंत्रीमंडळात एकही मुस्लीम मंत्री नाही याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, ”मोदीजी देशात हिंदू मुसलमान करत आले आहेत. मोदीजींना वाटते की मुसलमानांनी त्यांना मत दिले नाहीए त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळात एकही मुस्लीम मंत्री नाही. हे आमच्या संविधानविरोधात आहे. हे सरकार जात धर्माच्या आधारावर काम करत आहे. प्रधानमंत्री कुठल्या एका जाती धर्माचा नसतो. नितीश कुमार व चंद्राबाबूंना हे मान्य आहे का? नरेंद्र मोदींनी नाही बनवला तर नितीश कुमार व चंद्राबाबूंनी त्यांच्या कोट्यातून मुस्लीम मंत्री बनवायला हवा होता. का ते देखील आले दबावात?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

”नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान, जितनराम मांझी यांना काय मिळाले आहे? कुमारस्वामींना मोस्ट रिजेक्टेड मंत्रीपद मिळाले आहे. कुणालाही मोठे मंत्रालय नाही मिळाले. न लोकसभा अध्यक्षपद नाही मिळाले. चंद्राबाबूंना नाही मिळाले तर मिंधेंना काय मिळेल. भाजपनेच आप आपसात सर्व मोठी मंत्रालयं वाटून घेतली आहेत. मला वाटतं हे सरकार टिकणार नाही”.,असे संजय राऊत म्हणाले.

”अमित शहा व नरेंद्र मोदींची मानसिकता मी ओळखतो. हे दुसऱ्यांच्या ताकदीला घाबरतात. मोदी शहा फडणवीस यांच्या ताकदी या ईडी सीबीआय पोलीस या यंत्रणांमध्ये आहेत. हे त्यांचे रिअल आत्मा आहेत. हे आत्मे काढून टाकले शरीरातून तर यांच्यात काहीच उरत नाही. फडणवीस म्हणतात मी हरलेलो नाही. फडणवीसांनी ईडी सीाबीआयचे हत्यारं बाजूला करून लढायला यावे. आमच्यासमोर एक मिनीट देखील मैदानात ते टीकणार नाहीत. या ज्या एजन्सीचा गैरवापर करता आणि आमच्यासोबत लढता. तुमच्यासारखे ड़रपोक लोकं मी राजनितीक आयुष्यात नाही बघितले, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

”मोहन भागवत यांच्या आशिर्वादाने हे सरकार चाललं आहे. मोहन भागवत जी मोदी जे अहंकार जे बाळगतायत त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल ते बघा नुसतं टीका करून काही होत नाही. एकतर मोहन भागवतांनी स्पष्ट सांगावं की आमचा व भाजपचा संबंध नाही. जसं नड्डांनी सांगितलं की आम्हाला संघांची गरज नाही. भागवतांना वाटत असेल की हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाही तर त्यांनी हे सरकार खाली खेचावं, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

मिंधे, अजित पवार गट, मनसे हे सुपारीबाज पक्ष

मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर मिंधे, अजित पवार गट, मनसेमध्ये अस्वस्थता असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ”अस्वस्थता असायला पक्ष जागेवर असायला लागतो. अस्वस्थता कोणामध्ये असते ज्यांचा पक्ष जागेवर असतो. एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांचे ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत. त्यांच्यात कसली अस्वस्थता असणार? भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. सुपारीबाज पक्ष आहेत. त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीवर हल्ले करा व त्यांना कमजोर करा हे काम दिलेलं आहे. या तिघांना दिलेल्या सुपाऱ्या आहेत. त्यांनी तुरुंगाच्या धमकीने या सुपाऱ्या स्वीकारल्या आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.