उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शेवटच्या काळात पेशव्यांचे राज्य पुण्यात ज्या पद्धतीने सुरू होते त्याच पद्धतीने फडणवीस व त्यांचे लोक काम करीत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व हे घाशीराम कोतवाल करीत आहेत, असा आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करून अशी त्यांना की भीती वाटते, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी उद्या, रविवारी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संजय राऊत आज नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात की वन नेशन वन इलेक्शन. पण चार राज्यांतल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र या फक्त चार राज्यांच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही आणि वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करीत आहेत. हे खोटारडे लोक जनतेला मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा असल्याची टीकाही त्यांनी केली.
नरेंद्र मोदी यांनी नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या, गरीब, संरक्षण, सामाजिक न्याय अशा बाबतीत काँग्रेसच्या वर्षानुवर्षे योजना होत्या, पण मोदींनी फक्त नावे बदलली, योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली असल्याचे ते म्हणाले.
दीड हजाराऐवजी तीन हजार
लाडकी बहीण योजना हा सत्ताधाऱ्यांसाठी टर्निंग पॉइंट नाही असे सांगून संजय राऊत म्हणाले की, महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वीही आलेल्या आहेत. ते दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला हा पैसा आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचे सरकार येईल तेव्हा पंधराशेऐवजी आम्ही तीन हजार रुपये करू हा आमचा शब्द असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.