सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत; ज्यांनी पद, प्रतिष्ठा, ताकद दिली, त्यांना सल्ला देणे हे फार इंटरेस्टींग आहे! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा दावा एक गट करतो, तर दुसरा गट अशी चर्चा झाली नसल्याचे म्हणत हा दावा फेटाळला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून विलीनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडा असे ते म्हणाले. हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी यातून मार्ग काढावा. पण मला गंमत वाटली की सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हे फार इंटरेस्टींग आहे, असे संजय राऊत गुरुवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या प्रक्रियेचे राजकारण जोरात सुरू झाले. विशेषत: अजित पवार गटाकडून. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली ते आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत. पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. आमचा विषय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीशी आहे.

या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे. आमचा संबंध या विषयापुरताच आहे. आता विलीनीकरणाचे पतंग उडवले जात आहेत. एक गट म्हणतो चर्चा झाली, एक म्हणतो चर्चा झाली नाही. विश्वास कुणावर ठेवायचा? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.

विलीनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री नव्हते असे शरद पवार म्हणाले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हे मी आधीही सांगितले आहे की, अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल. विलीनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती, याची आम्हालाही माहिती होती. पण त्या चर्चेला खीळ बसली. ते त्यांचे राजकारण होते, त्याच्याशी शिवसेना, काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असे वाटत नाही. जेव्हा ते दोन पक्ष निर्णय घेतील तेव्हा महाराष्ट्राचा राजकारणात काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न विचारा. पण त्याला अजून वेळ आहे. परंतु आता अजित पवार गटाची लोक ज्या पद्धतीने भूमिका मांडताहेत तेव्हा मला असे वाटते की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला उत्सुक दिसत नाही, कारण अमित शहा, मोदींची इच्छा नसावी, असेही राऊत म्हणाले.

काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास झाली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्या त्यांच्या सूनबाई आहेत. सुनेत्राताई यांनी पती गमावला आहे, शरद पवारांनी पुतण्या नाही तर मुलाप्रमाणे असणाऱ्या अजित पवारांना गमावले आहे. त्याच्यामुळे शरद पवार त्यांच्या सुनबाईच्या घरी गेले तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावे असे काही नाही.