
महायुतीतील मित्रपक्ष शिंदे गट आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याचं कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण यांनी वसई-विरार पालिकेवरून केलेलं वक्तव्य आहे. वसई-विरार पालिका दत्तक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना द्या, असं चव्हाण म्हणाले आहेत. यावरूनच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिला आहे. महायुतीत फाटाफूट झाली तर निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील, असा इशारा त्यांनी चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दिला आहे.
काय म्हणाले रवींद चव्हाण?
भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना रवींद चव्हाण म्हणाले आहेत की, “वसई-विरार पालिका ही योग्य व्यक्ती आणि विचाराच्या हातात जाणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वानी जसा लोकसभेला आणि विधानसभेत विचार केला. तसाच विचार करून एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात ही महानगरपालिका दत्तक म्हणून द्या.”
यावरच प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, “त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेलं ते विधान आहे. परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे. अशा पद्धतीने जर फाटाफूट झाली तर, भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका आज या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील.”




























































