काँग्रेसला मिळणार ‘संजीवनी’? चंद्रपूरच्या महापौराचे नाव ठरल्याची चर्चा

काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता संपुष्टात आले असून, महापौर कुणाला करायचे, हा प्रश्न निकाली काढण्यात आला. चंद्रपूरचे महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे पक्षात मोठी चुरस बघायला मिळत आहे. यात प्रामुख्याने चार नावे आघाडीवर होती. माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वनश्री मेश्राम आणि संजीवनी वासेकर या महिला नगरसेवकांचा यात समावेश होता. वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही चालेल, असा उमेदवार निश्चित करायचा असल्याने संजीवनी वासेकर यांचे नाव पक्के करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक दहामधून त्यांनी विजय मिळवला. आरक्षणापूर्वी चर्चेत कुठेही नाव नसताना अचानक त्या महापौर पदाच्या शर्यतीत आल्या.

गटनेता आणि महापौराचे नाव ठरले

”चंद्रपूरचा विषय आता संपला आहे. इथे काँग्रेसला झेंडा फडकवायचा आहे. आज गटनेता ठरणार असून, महापौर पदाचा उमेदवारही ठरला आहे. गटनेता आणि महापौराचे नाव आज सायंकाळपर्यंत जाहीर केले जाईल. चंद्रपुरात सत्ता स्थापन करताना शिवसेनेला सोबत घेत आहोत. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला. सत्तेतील भागीदारी त्यांना दिली जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.