>> संजीव साबडे
विविध प्रांताचे खाद्यपदार्थ एकत्र खाण्यात आणि काही वेगळं करण्यात वेगळाच आनंद असतो. वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरे होणारे सणवार, उत्सव हेच शिकवतात आणि खाद्यसंस्कृतीद्वारे सलोखा व सामंजस्य वाढवतात. महाराष्ट्र, गुजरातचा प्रभाव असलेल्या नवरात्रात आपण या साऱयाचाच मिलाफ असलेल्या चवीधवी अनुभवतो. सोबत गरबा नृत्य आणि भोंडल्याचा आनंदही घेतो. हीच खरी सांस्कृतिक देवाणघेवाण.
नवरात्र खऱ्या अर्थाने महिलांचा सण व उत्सव. देवीची पूजा जशी असते, तसेच मुली व महिलांना या नऊ दिवसांत गरबा, दांडिया यात नाचता येते. विविध रंगांच्या साड्या नेसण्याची संधी असते आणि डिझायनर, पारंपरिक मिश्रणाचे कपडे घालता येतात. अधिक काळ घराबाहेर राहताही येतं. गणपतीप्रमाणेच नवरात्रीत देवीला काय नैवेद्य द्यायचा, हाही प्रश्न पडतो. कधी दुधाचा, कधी तुपाचा, तर कधी साखर, गूळ, केळं यांचा नैवेद्य द्यावा, असं आपल्याला सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे भरपूर साजूक तूप घातलेला शिरा, कधी साखर घालून लाडू, तर कधी गुळाचे लाडू वा गूळपापडी, दुधाची खीर, बासुंदी वा माव्याची बर्फी, नारळाच्या वाड्या, असा नैवेद्य आणि प्रसाद बहुतेक घरी बनतो वा काही या मिठाया विकत आणतात. पण अमुकच नैवेद्य द्यायचा वा द्यावा लागतो हे धार्मिक बंधन नाही. आपणास योग्य वाटेल आणि स्वतला खायला आवडेल असेच प्रकार नैवेद्य म्हणून ठेवायचे. सण म्हणजे गोडधोड आणि मिठाया. गणपती, नवरात्र, दसरा वा नाताळ असो. दिवाळीमध्येही गोड प्रकारांचा मारा आणि त्यावर उतारा म्हणून चिवडा, चकल्या, शेव, कडबोळी असे तिखट-मिठाचे पदार्थही असतात.
मुंबईतल्या नवरात्रीवर गुजरातचा प्रभाव आहे. त्यामुळे उंधीयू, ढोकळा, खमण, खमणी, फाफडा, जिलेबी, दाबेली, ठेपला अशा पदार्थांची हमखास आठवण होते. नवरात्रीच्या काळात मिठायांबरोबर या फरसाणाचा आणि अळूवडी, कोथिंबीर वडी, खाकरा आदींचा खप वाढतो. नवरात्र हा गुजरातमध्ये सार्वजनिक उत्सव असतो. मराठी घरी घट बसतात आणि पूजा व देवींची आरती होते. बाकी शास्त्रात सांगितलं तो नैवेद्य. कर्नाटक, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये या सणाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. तिथला नैवेद्यही वेगळा. सण हा संस्कृतीचा भाग आहे आणि आपले अनेक खाद्यपदार्थही याच संस्कृतीतून आले आहेत.
नवरात्रीच्या काळात म्हणजे हस्त नक्षत्रापासून अनेक मराठी कुटुंबांत व वसाहतीत नऊ दिवस भोंडला असतो. हस्त हे पावसाचे नक्षत्र मानले जातं. मुंबईत भोंडला कमी झाला आहे. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण, नाशिक, पुणे व कोकणात भोंडला असतो. भोंडला हा मुली आणि महिलांचाच खेळ प्रकार. त्या गोलाकारात वेगवेगळी गाणी म्हणत फेर धरतात व नाचतात. हत्ती ही हस्त नक्षत्राची ओळख. त्यामुळे भोंडला सुरू होण्याच्या आधी पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याची पूजा करतात. भोंडल्याच्या गाण्यांत ऐलमा पैलमा काय सांगू देवा, काळी चंद्रकळा नेसू कशी, खारीक खोबरं बेदाणा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, नणंद भावजय दोघी जणी, अक्कण माती चिक्कण माती, कारल्याचा वेल लाव ग सुने, आड बाई आडोणी, कृष्णा घालतो लोळण, अरडी ग बाई परडी, अशी गाणी म्हटली जातात. ग्रामीण भागात या सणाला हादगा किंवा भुलाबाई असंही म्हणतात. खरं तर हा कृषी जीवनाशी संबंधित सण. भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाई हा मराठी खेळ प्रकार कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अधिक. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात तो फारच कमी.
या खेळाचं आणि खिरापतीचंही घट्ट नातं आहे. या खेळासाठी जमणाऱ्या साऱ्या जणी येताना शक्यतो एक खाद्यप्रकार घेऊन येतात. खेळून दमल्यावर खातात. पूर्वी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी दोन असं करत नवव्या दिवशी नऊ पदार्थ असत. लाडू, चिक्की, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी वा मसाला दूध, सुका मेवा, साखर-फुटाणे, खरवस, वाटली डाळ, कुरडया, पापडय़ा, खीर, उपासाची बटाटा भाजी, नारळाच्या वड्या, म्हैसूर पाक किंवा लिम्लेटच्या गोळ्याही असत. इतर जणींनी तो पदार्थ काय आहे हे ओळखायचं. ओळखता आलं नाही तर श्रीबालाजीचीसासुमेली म्हणत. म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, चिक्की वा चिवडा, साखर-फुटाणे, सुका मेवा, ओला मेवा, लिम्लेटच्या गोळ्या. आता फ्रेंच फ्राईज, कुकीज, मोमो वा ढोकळा वा दक्षिणेच्या राज्यातीलही एखादा पदार्थ असतो.
पूर्वी मुली व महिलांच्या बाहेर पडण्यावर बंधनं होती. त्यामुळे भोंडला, मंगळागौरीच्या निमित्ताने त्या एकत्र येत. मग गप्पा, खेळ, नाच, गाणं आणि एकत्र खाणं हे सर्व होई. आता तशी बंधनं नाहीत. बऱ्याच जणी नोकऱ्या करतात, पण गरबा व दांडिया यांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्यानं भोंडला मागे पडला आहे. देवीच्या वाराप्रमाणे असंख्य महिला संबंधित रंगाची साडी नेसतात वा ड्रेस परिधान करतात. अनेक जणी कार्यालयात गरबा खेळतात. तसाच भोंडलाही खेळता येईल.
कॉलनी, कार्यालय, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या जातीधर्माच्या व प्रांताच्या महिला एकत्र येतात. त्यांनी आपापल्या प्रांताचे खाद्यपदार्थ आणले तर काय धमाल येईल. एकाच वेळी लाडू, गुलाबजाम, पायसम, मसाले भात, उंधीयू, भजी वा समोसे, उनिअप्पम, पिझ्झा, तिखट करंज्या असे प्रकार एकत्र खाण्यात आणि काही वेगळं करण्यात खूप आनंद मिळेल. शिवाय तुमची इमारत वा वसाहत, कार्यालय आणि रेल्वेचा डबा हेच खाऊगल्ली होतील. त्यामुळे लगेच ठरवा किंवा पुढच्या वर्षासाठी यंदाच्या तयारी करा. खाद्यपदार्थांसह आपापसात भेटणं हेही खाऊगल्लीच आहे.