
‘जॉय ऑफ सिटी’त संजू सॅमसनच्या 97 धावांच्या झुंजार-तडाखेबंद आणि तितक्याच संयमी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने विजयाची शिट्टी मारली. उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप लाभलेल्या सुपर एटच्या अखेरच्या साखळी सामन्यात हिंदुस्थानने वेस्ट इंडीजचे 196 धावांचे जबर आव्हान 4 चेंडू आणि 5 विकेट राखून पार करत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सहाव्यांदा उपांत्य फेरी गाठली. आता गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीच्या संघर्षात हिंदुस्थानची गाठ इंग्लंडशी पडेल.
वेस्ट इंडीजने एकाही फलंदाजाकडून अर्धशतकी खेळी न साकारताच 195 धावांची मजल मारत सामन्याचा थरार वाढवला. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा दम निघणारच होता आणि तो निघालाही, पण गेल्या सहापैकी दोन सामने खेळलेल्या संजू सॅमसनने आज संधीचे सोने करताना 50 चेंडूंत 97 धावांची मॅचविनिंग खेळी केली.
संजू बन गया मॅचविनर
अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या दहा धावांच्या निराशेने हिंदुस्थानी संघाचा दमच काढला होता. 2 बाद 41 नंतर साऱयांचे लक्ष सूर्यकुमारच्या बॅटकडे लागले होते, पण त्याची बॅट चाललीच नाही. त्यानंतर नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असलेल्या संजूने आपली एक नंबर फटकेबाजी दाखवत सर्वांची मने जिंकली. तो उभा राहिला, लढला, खेळला आणि मोठे फटके मारून सर्वांची मने जिंकून गेला. त्याच्या चार षटकार आणि 12 चौकारांनी विंडीजच्या आक्रमणाची लक्तरे काढली.






















































