
माझ्या बापाला हाल हाल करून मारले त्याचे काहीच वाटत नाही, पण पोटात दुखल्याचे नाटक करणाऱया वाल्मीक कराडवर एवढी दया दाखवली जातेय, हा आमच्यावर अन्याय आहे. ताबडतोब कराडला रूग्णालयातून बाहेर काढून तुरुंगात पाठवा. माझ्या वडिलांचे मारेकरी आणि त्यांना साथ देणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने आज येथे आपला संताप व्यक्त केला.
बीडचा आका वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांनी अत्यंत निर्घृणपणे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व कोठडीत हत्या झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीयांचा जनआक्रोश मोर्चा आज मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा काढण्यात आला. आझाद मैदानात सर्वपक्षीयांच्या वतीने समाजात तेढ निर्माण करणाऱया सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
जातीयवादी सरकारने देशमुख व सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. कराडसारखी सामाजिक विकृती ठेचून काढली पाहिजे. दावोसमध्ये जाऊन उद्योग आणल्याचे सांगणाऱया मुख्यमंत्र्यांनी आधी राज्यात सुरू असलेला हत्येचा उद्योग थांबवावा, कराड आणि त्याचे साथीदार व त्याच्या आकावर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. यावेळी दीपक केदार, अशोक कांबळे, सिद्धार्थ कासारे, सचिन खरात, कांद्रे, अयोध्या पौळ आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणाचे व्हिडीओ किंवा गुपिते कराडकडे आहेत का?
सरपंच संतोष देशमुख यांची तसेच अन्य काही जणांची हत्या करणारा कराड ही एक सामाजिक विकृती आहे. अशा विकृती सरकार जन्माला घालत आहे. या विकृती वेळीच ठेचल्या पाहिजे. न्यायालयीन कोठडी सुनावलेली असताना कराड मस्त इस्पितळात आयसीयूमध्ये जाऊन झोपला आहे. त्याला आता वेगवेगळे आजार जडतील आणि तो असाच इस्पितळात आराम करत पडून राहील. उलट आणखी चार डॉक्टर त्याच्या दिमतीला झुंपले जातील, अशी टीका करतानाच त्या कराडचे ऐवढे लाड का पुरवले जाताहेत? त्याच्याकडे कुणाचे व्हिडीओ आहेत का? अशी कुठली गुप्त माहिती कराडकडे आहे की त्याच्यावर कारवाई करायला सरकार घाबरत आहे, असा सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते-आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.