
मुंबईतील तलवारबाजी करणाऱया आणि इच्छुक असलेल्या तब्बल दोनशे खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अस्मिता तलवारबाजी स्पर्धेत आपली कमाल दाखवली. विविध गटांत सान्वी साळुंखे, किमया कमाल, रिद्धिमा सिंग आणि अनुजा लाड यांनी जोरदार खेळ करत सोनेरी यश संपादले.
शेकडो युवा खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत सुवर्णपदकांची अक्षरशः बरसात केली. 178 खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत 12 वर्षांखालील गटात सानवी साळुंखे (ईपी), बरीरा खान (फॉइल) आणि कुणी शेट्टी (सेबर) यांनी सुवर्णपदक पटकावत वर्चस्व गाजवले. 14 वर्षांखालील गटात किमया कुणाल, समारा पेवेकर आणि सिया इंदाणी यांनी दमदार खेळ करत सुवर्णावर नाव कोरले. 19 वर्षांखालील गटात रिद्धिमा सिंग, अनुष्का यादव आणि क्षेत्री प्रिशा यांनी अचूक वार करत सर्वोच्च स्थान पटकावले. वरिष्ठ गटात अनुजा लाड, हेदवी सावंत आणि संथा यादव यांनी अनुभव आणि काwशल्याच्या जोरावर सुवर्णपदके जिंकत आपली ताकद दाखवली.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते झाले, तर जॉय निकाळजे, मंजिरी मराठे आणि भास्कर करकेरा आणि संघटक राहुल वाघमारे यांची उपस्थिती लाभली. मुंबई तलवारबाजी संघटना आणि सावरकर स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळाली.





























































