टीम इंडिया सध्या बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिका संपल्यानंतर टीम इंडिया न्युझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मालिकेसाठी सरफारज खानची निवड पक्की मानली जात आहे. परंतु मुंबईच्या स्टार खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात तब्बल 27 वर्षांनी इराणी करंडकावर मुंबईच्या संघाने आपले नाव कोरले. मुंबईच्या विजयात सरफराज खानचा खारीचा वाटा होता. त्याने 222 धावांची तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला. इराणी कपमध्ये मुंबईकडून द्विशतक झळवणारा तो पहिला फलंदाज ठरला. तसेच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सुद्धा त्याचा टीम इंडियात समावेश होता. तसेच रणजी ट्रॉफीतील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आगामी न्युझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरफराजची टीम इंडियामध्ये निवड होण्याची दाट शक्यता आहे.
रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी न्युझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरला यावर्षी झालेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर मात्र टीम इंडियाच्या कसोटी संघात त्याचे पुनरागमन होऊ शकले नाही. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला फार काही चांगला खेळ करता आलेला नाही. त्यामुळे न्युझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.