गणेशोत्सवासाठी सातारा नगरपालिकेची जय्यत तयारी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सातारा नगरपालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांच्या परवान्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातार्‍यात पाच ठिकाणी विसर्जनतळी उभारण्यात येत आहेत. गर्दीची शक्यता असल्याने गोडाली गार्डन आणि बुधवार नाका कृत्रिम तळ्यावर फोकस राहणार आहे.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवाचे सूक्ष्म नियोजन केले आहे. सातार्‍यात गणेशाच्या मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. अशा मोठ्या मूर्तींसाठी कृत्रिम तळी उभारण्यात येत आहेत. या कृत्रिम तळ्यांची स्वच्छता सुरू झाली आहे. कृत्रिम तळ्यांमध्ये प्लॅस्टिक कागद अंथरूण त्यामध्ये पाणी भरून घेण्यात येणार आहे. कृत्रिम तळ्यांवर उजेडासाठी मोठे हॅलोजन बसवण्यात येणार आहेत. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी व्यासपीठ असेल.

ऐतिहासिक तळ्यांमध्ये विसर्जनास मनाई

ह सातार्‍यात मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ५ तळ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर, ऐतिहासिक मंगळवार तळे, मोती तळे तसेच फुटका तलावात गणेश विसर्जन करण्यास बंदी असेल. या परिसरात घरगुती गणेश विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या असतील. विसर्जन मिरवणूक मार्ग राजवाडा-मोती चौक ते कमानी हौद चौक ते खालच्या रस्त्यावरील शेटे चौक पाचशे एक पाटी ते पुन्हा मोती चौक प्रतापगंज पेठ-बुधवार नाका ते विसर्जन तळे असा राहणार आहे. बुधवार नाका तसेच गोडोली गार्डन कृत्रिम तळ्यावर क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. गोडोलीत ५ टनी, तर बुधवार नाक्यावरील तळ्यावर १० टनी क्रेन तैनात करण्यात येणार आहे.

विसर्जनासाठी १६ ठिकाणी पाणीटाक्या

ह सातार्‍यात घरगुती गणेश प्रतिष्ठापणा मोठ्या प्रमाणात केली जाते. या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येणार आहेत. गोडोली कल्याणी शाळेसमोरील तलाव, बुधवार नाका कृत्रिम तलावाजवळ, राजवाडा पोहणे तलावाजवळ, हुतात्मा स्मारक, सदरबझार दगडी शाळा, फुटके तळे, विश्वेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, मंगळवार तळे, महादरे तळे, दिवेकर हॉस्पिटल शाहूपुरी, देशपांडे मारुती मंदिर यासह १६ ठिकाणी विसर्जनासाठी पाणी टाक्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी ३५ लाईफगार्ड

ह सातार्‍यात पाच कृत्रिम तळ्यांची गणेश विसर्जनासाठी उभारणी करण्यात येणार आहे. ही तळी पाण्याने काठोकाठ भरून घेण्यात येणार आहेत. गणेशोत्सवकाळात या सर्व तळ्यांवर लाईफगार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. बुधवार नाका व गोडोली गार्डन कृत्रिम तळ्यावर प्रत्येकी १०, तर इतर तीन ठिकाणी प्रत्येकी पाच लाईफगार्ड तैनात असणार आहेत.