
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या शेकडो ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला चढवला. यामध्ये चाळीसजण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.
पसरणी येथील अंकुश चव्हाण यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अंत्यविधी सुरू असताना, मधमाशांच्या समूहाने हल्ला चढवला. यामध्ये चाळीसजण जखमी झाले, तर काहीजण गंभीर जखमी झाले. यामध्ये वैशाली सुभाष चव्हाण, माधवी प्रशांत चव्हाण, पूनम सुशांत चव्हाण, सुनील पोळ, केशव गंगाराम महांगडे, यशवंत नारायण चव्हाण, सुभाष अंकुश चव्हाण, किरण केशव महांगडे, शांताराम मारुती शिर्के, दीपक अंकुश चव्हाण, अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्याठिकाणी उपस्थित असणारे शेकडो ग्रामस्थ या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये सैरावैरा धावू लागले. काही ग्रामस्थांनी शेजारी असणाऱ्या नदीमध्ये उड्या मारल्या, तर काही ग्रामस्थ शेजारी असणाऱ्या शेतांमध्ये धावू लागले. त्याठिकाणी असणाऱ्या महिलांवर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. ज्यामध्ये दोन ग्रामस्थ जखमी झाले. त्यांच्यावर वाई येथे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, ज्यांना कमी त्रास झाला त्यांना प्राथमिक उपचार करून सोडून दिले.
ही घटना गावातील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी स्वप्नील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने वाई आरोग्य विभागाच्या माध्यमातून जवळपास 40 ग्रामस्थांना तातडीने अँटिपोजनेस इंजेक्शन पसरणी येथील उपकेंद्रामध्ये देण्यात आले. यामध्ये आरोग्य विभाग व महसूल विभाग, वाई यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याठिकाणी ग्रामस्थांना मदत करण्यासाठी संपत महांगडे, दादा पाटील, उत्तम गाढवे आदी उपस्थित होते.