
ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिसच्या पायऱ्या गेल्या अनेक महिन्यांपासून झिजल्या आहेत. त्यामुळे प्रवासी जिन्यावरून घसरून वारंवार अपघात होत आहेत. विविध योजनांसाठी महापालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना सॅटिस पुलाच्या पायऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर ठाणे महानगरपालिकेने जिन्याची दुरुस्ती करावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
ठाणे पश्चिमेकडील सॅटिस प्रकल्प 18 वर्षांपूर्वी उभारण्यात आला. या सॅटिसवरून ठाणे शहरासाठी अनेक बसेस सुटतात. ही बस पकडण्यासाठी रेल्वेचे प्रवासी पायऱ्यांवरून सॅटिसवर जातात. तर अनेक प्रवासी सॅटिसच्या जिन्यावरील पायऱ्या उतरून लोकल पकडण्यासाठी फलाटावर जात असतात. या जिन्यावरील लोखंडी प्लेट्स तसेच पायऱ्यांवरील लाद्या झिजल्यामुळे गुळगुळीत झाल्या असून रोज सहा ते सात प्रवासी पाय घसरून जखमी होत आहेत. या सॅटिसवर महापालिकेचे सुरक्षारक्षक असूनही जिन्याच्या दुर्दशेकडे कुणाचेही लक्ष नाही.
आयुक्तांचे लक्ष वेधले
ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी या गंभीर प्रश्नाकडे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून प्रवाशांची होणारी ‘घसरगुंडी’ रोखण्यासाठी त्वरित दुरुस्ती हाती घ्यावी व योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. ठाणे स्थानक गाठण्यासाठी अनेक प्रवासी बसने सॅटिसवर येतात. पण पायऱ्या उतरताना या प्रवाशांची दमछाक होत आहे. प्रशासनाने त्वरित दुरुस्ती हाती घ्यावी.
नंदुकमार देशमुख, (अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना)




























































