Indonesia open badminton 2025 – सात्त्विक-चिरागची आगेकूच, सिंधू पराभूत

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या अव्वल मानांकित जोडीने इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र महिला एकेरीतील स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू दुसऱयाच फेरीत गारद झाल्याने हिंदुस्थानी चाहत्यांना मोठा धक्का बसला.

2023मधील चॅम्पियन सात्त्विक-चिराग जोडीने रासमुस गेम्के व फ्रेड्रिक सोगाई या डॅनिश जोडीचा 16-21, 21-18, 22-20 असा पराभव करीत आगेकूच केली. हिंदुस्थानी जोडीने पहिला गेम गमविल्यानंतर लढतीत जोरदार पुनरागमन करत अवघ्या 68 मिनिटांत ही लढत जिंकली. या जोडीच्या रूपाने हिंदुस्थानचे स्पर्धेत एकमेव आव्हान शिल्लक आहे.

दरम्यान, दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूला आठव्या मानांकित थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिने 21-15, 20-22, 21-10 अशा तीन गेममध्ये पराभूत केले. हा सामना तब्बल 78 मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये अपयशी ठरलेल्या सिंधूने दुसऱया गेममध्ये पुनरागमन केले. मात्र निर्णायक तिसऱया गेममध्ये तिला सूरच गवसला नाही अन् पराभवासह सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

महिलांच्या दुहेरीतही हिंदुस्थानसाठी अपयश आले. गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली या जोडीला दुसऱयाच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे तनीषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या अनुभवी-ज्युनियर जोडीलाही पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत तनीषा-अश्विनी जोडीला थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपिसारा-पुथिता जोडीकडून 25 मिनिटांत 7-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीतदेखील हिंदुस्थानच्या कुशी कुशरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीला जपानच्या जोडीकडून 13-21, 22-24 असा पराभव मिळाला.