…तर एक दिवस लोक पेटून उठतील, तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक;  सरकारला सुनावले

नाशिकच्या तपोवनातील एक झाड तोडलं तर दहा झाडं लावू, हे विधानच फालतू असून सरकार बेजबाबदार वागत आहे. झाडे वाचवण्यासाठी एक दिवस लोक पेटून उठतील, असा इशारा ज्येष्ठ अभिनेते, अजित पवार गटाचे सयाजी शिंदे यांनी सरकारला दिला.

कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी महापालिका जुन्या हेरिटेज वृक्षांसह 1700 झाडे तोडणार आहे, याविरोधात नागरिक एकवटले आहेत. ही झाडे वाचवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते, अजित पवार गटाचे सयाजी शिंदे यांनीही आवाज उठवला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी एक झाड तोडलं तर दहा झाडे लावू, असे विधान केले. त्यावर सयाजी शिंदे म्हणाले की, हे विधानच फालतू आहे. आपलंच सरकार आहे पण ते बेजबाबदारपणे वागत आहे, आम्ही शंभर माणसं बलिदान देण्याचा पवित्रा घेऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, असे त्यांनी सुनावले. सात-दहा वर्षांपूर्वीच्या झाडांचा हिशोब कसा घेणार, असा सवाल केला. सरकारने डोळे उघडले पाहिजेत, नाही तर एक दिवस लोक पेटून उठतील, असा इशाराही दिला.