बीड जिल्हा परिषदेतील घोटाळा: सचिवांच्या साक्ष ऐनवेळी रद्द; घोटाळेबाजांना कोणाचे अभय?

15

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या तब्बल शंभर कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात प्रधान सचिवांच्या आदेशानुसार नऊ सचिवांच्या होणाऱ्या साक्ष ऐनवेळी रद्द झाल्या, या साक्ष पुढे लांबवण्यात आल्या आहेत. घोटाळेबाजाना कोण अभय देतंय याबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. त्यातच एकीकडे सचिवांच्या साक्ष रद्द झाल्या तर दुसरीकडे पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे तडकाफडकी बीडमध्ये येऊन गेल्याने बीडमध्ये उलट सुलट चर्चा रंगत आहे.

बीडच्या जिल्हा परिषदेत सत्तेचा गैरवापर करून सन 2012 – 2013 या वर्षात अधिकाऱ्यांच्या संगनमताने जिल्हापरिषदेच्या वित्त विभाग, जलसंधारण विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभागातील तत्कालीन अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमत करून 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाला होता. हा घोटाळा पंचायत राज समितीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले. या घोटाळ्याला तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह काही उपमुख्य कार्यकारी अधिकारींसह डझनभर अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात नऊ सचिवांच्या 11 डिसेंबर मध्ये साक्ष होणार होत्या. तसे प्रधान सचिवांचे आदेश होते. मात्र ऐनवेळी सचिवांच्या साक्ष रद्द झाल्या. याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असतांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे तडकाफडकी बीड मध्ये दाखल झाले. शासकीय विश्रामगृहावर त्यांची बडदास्त ठेवण्यात आली. कदाचित स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर श्रद्धांजली वाहण्यासाठी ते आले असावेत असा अंदाज होता. मात्र ते गोपीनाथ गडाकडे गेलेच नाहीत. त्यांचे बीडमध्ये अचानक येण्याचे कारण ही अद्याप समजू शकले नाही. या दोन घडामोडींनी बीड जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या