कोरोनाच्या सावटातही सोलापूरात विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांहून अधिक बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे गडद सावट असले तरी विद्यार्थ्यांचे शाळेकडून स्वागत करण्यात आले. पालकांमध्येही कोरोनाची भीती अद्यापही असून, विद्यार्थी मात्र शाळेच्या ओढीने आल्याचे चित्र होते. शाळेत शासननिर्देशाप्रमाणे आवश्यक काळजी घेण्यात आली. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 213 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात 9वी ते 12वीपर्यंतच्या 1 हजार 897 शाळा असून, यात 1 लाख 20 हजार विद्यार्थी आहेत. एकदिवसाआड वर्ग भरविण्यात येणार असून, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या पहिल्या दिवशी तासिका झाल्या. प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून तयारी सुरू केली होती. शाळेत गेल्या दोन दिवसांपासून वर्गांची स्वच्छता, सॅनिटायझर, थर्मामीटर, पल्स मीटरची सुविधा करण्यात आली होती. शाळेसमोर सामाजिक अंतरासाठी खुणा आखण्यात आल्या होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे तापमान तपासूनच वर्गात सोडले होते. काही शाळांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र अल्प दिसून आली. गेल्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा विश्वास काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील जवळपास 85 टक्क्यांहून अधिक शिक्षकांची आरोग्य तपासणी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या