मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज शाळेचा पहिला दिवस उजाडला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देऊन लेझीमच्या तालावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यंदा शाळेचा पहिला दिवस नवीन संकल्पाचा ठरला. नवीन वर्षात अभ्यासासोबत नवीन गोष्टी शिकण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
प्रवेश पाडवा
शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी ‘प्रवेश पाडवा’ आयोजित करण्यात आला होता. शाळेत पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम ‘प्रवेश पाडवा’अंतर्गत राबविण्यात येतात. दैनंदिन जीवनातील गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाव्यात हा उपक्रमाचा उद्देश आहे. खेळण्याच्या माध्यमातून वस्तू मोजणे, अभ्यासासोबतच खेळांचा वापर आदी विविध उपक्रम यात समाविष्ट आहेत.
सुलेखन वर्ष साजरा करण्याचा संकल्प
प्रबोधन कुर्ला या शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी अनोखा संकल्प केला. हे नवीन शैक्षणिक वर्ष सुलेखन वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प शाळेने केला आहे. शाळेत पार पडलेल्या प्रवेशोत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्यासह सुलेखनकार अच्युत पालव, अनिल गोवळकर, अभिनेते अतुल परचुरे, संतोष लिंबोरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका विद्या फलके, विशाखा परब, जयदीप हांडे, नीलेश कोरगावकर, कला शिक्षक सुरेश सरोदे, संतोष चिकणे, शुभांगी मेमाणे आदी उपस्थित होते.
मुंबई महापालिका शाळांत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्वागत केले. शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने विशेष करून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रवेश पाडवा पहिले पाऊल’ आयोजन करण्यात आले.
वरळी सी फेस येथील पालिका शाळेत आयोजित उपक्रमाचा शुभारंभ डॉ. गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, हा उपक्रम पुढील 15 दिवस राबवण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप गगराणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.