अचानक निमंत्रण लाभलेला स्कॉटलॅण्ड विंडीजला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या दोन आठवडय़ांपूर्वी अचानक निमंत्रण मिळाल्यानंतर स्कॉटलॅण्ड आजपासून टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतोय. बांगलादेशच्या माघारीमुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेत स्कॉटलॅण्डने अल्प तयारीत हिंदुस्थानात धाव घेतली. मर्यादित सदस्य संख्या असूनही व्हिसा, किट आणि प्रायोजकाची व्यवस्था करून संघ सज्ज झाला आहे. सराव सामन्यांत पराभव पत्करावा लागला असला, तरी मागील तीन विश्वचषकांतील कामगिरीमुळे स्कॉटलॅण्डला हलक्यात घेता येणार नाही. परिणामतः वेस्ट इंडीजला ते आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न करणार, यात शंका नाही.

2022 मध्ये स्कॉटलॅण्डकडून पराभवाचा धक्का बसलेला असल्याने त्यांना सावध राहावे लागेल. कोलकात्याच्या परिस्थितीत सामन्याचा तोल काटय़ावर राहण्याची शक्यता आहे. स्कॉटलॅण्डसाठी ब्रँडन मॅकमलेन महत्त्वाचा खेळाडू आहे, तर वेस्ट इंडिजसाठी जेसन होल्डर आक्रमणाची धुरा सांभाळेल. निकोलस पूरन नसला तरी कॅरेबियन फलंदाजी अजूनही धोकादायक आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही.

संभाव्य अंतिम संघ

स्कॉटलॅण्ड ः जॉर्ज मन्सी, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमलेन, रिची बेरींग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस (यष्टिरक्षक), मायकेल लिस्क, क्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॉट, ब्रॅड व्हील, सफयान शरीफ.

वेस्ट इंडीज ः शाई होप (कर्णधार/यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर किंवा जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, गुडाकेश मोती, जेडन सायल्स.