
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या खात्यामधील बैठकांच्या वादामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला आहे. त्यातच आता सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार परदेश दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांना स्क्रीन देण्याच्या संदर्भात उद्या मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चाप’ लावल्याने एकनाथ शिंदे यांना बैठक रद्द करावी लागली आहे.
सध्या ‘सैयारा’ या हिंदी चित्रपटाची सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या कमी केल्याने, मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन मिळवून देण्याचे श्रेय लाटण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच पत्र जारी करून उद्या तातडीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात तातडीची बैठक आयोजित केली.
या बैठकीत निमंत्रितांच्या यादीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी, मल्टिप्लेक्सचे मालक व अन्य लोकांना निमंत्रित करण्यात आले होते.
बैठकीचे इतिवृत्त पाठवण्याचे आदेश
एकनाथ शिंदे यांनी परस्पर सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱयांना बोलावून परस्पर बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला. येवढेच नव्हे तर बैठक झाल्यावर बैठकीचे इतिवृत्तही उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मान्यतेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले. सांस्कृतिक मंत्री परदेशात असताना त्यांच्या विभागाला बैठक घेण्याचे आदेश कसे देण्यात आले, याची चर्चा सुरू होताच मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. त्यामुळे ही बैठक अखेर रद्द झाली आहे.