नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना रत्नागिरीत घडली. घटनेला 24 तास उलटले तरी अजून आरोपीचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. साळवीस्टॉप येथील सीसीटिव्ही बंद असल्यामुळे आरोपीच्या शोधकार्यात अडथळा आला आहे. मात्र आजूबाजूला असलेल्या काही सीसीटिव्हीचे फुटेज पोलीसांच्या हाती लागले आहेत.
सोमवारी सकाळी चंपक मैदान येथे एका 19 वर्षांच्या तरुणीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केला. ही तरुणी साळवीस्टॉप येथे रिक्षात बसली. रिक्षाचालकाने आणखी दोन प्रवासी घ्यायचे आहेत असे सांगून रिक्षा चंपक मैदानाच्या दिशेने वळवली. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने त्या तरुणीला पाणी प्यायला दिले. ते पाणी प्यायल्यानंतर ती बेशुध्द पडली. रिक्षाचालकाने तिला चंपक मैदान येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला तसेच बेशुध्दावस्थेत टाकून निघून गेला. या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरी शहरात संतापाची लाट पसरली होती.
प्रशासनाचे सीसीटिव्ही बंद…
पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. साळवीस्टॉप येथील सीसीटिव्ही बंद असल्यामुळे आरोपी पोलीसांच्या जाळ्यातून निसटला असला तरी आजूबाजूच्या सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत. त्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रशासनाने बसवलेले शहरातील काही सीसीटिव्ही बंद आहेत. देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे सीसीटिव्ही बंद आहेत. मात्र लोकसहभागातून काही सीसीटिव्ही शहरात लावण्यात आले आहेत. हे सीसीटिव्ही आता मदतीला आले आहेत.
शहरातील 57 सीसीटिव्हींपैकी किती सीसीटिव्ही सुरु?
रत्नागिरी शहराच्या सुरक्षेसाठी 57 सीसीटिव्ही लावण्यात आले होते. त्यापैकी आता किती सीसीटिव्ही सुरु आहेत हा संशोधनाचा विषय बनला आहे. सोमवारी रत्नागिरीत एका युवतीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपीचा शोध घेताना साळवी स्टॉप येथीत सीसीटिव्ही बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर रत्नागिरीकरांची सुरक्षाच रामभरोसे असल्याचे उघडकीस आले आहे. देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे हे सीसीटिव्ही बंद आहेत आणि त्याचा फटका काल पोलिसांना बसला. सीसीटिव्ही बंद असल्यामुळे आरोपी हातून निसटला आहे.
रत्नागिरी शहरामध्ये 57 सीसीटिव्ही बसवण्यात आले होते. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. सीसीटिव्हीमुळे शहरावर करडी नजर राहून शहराच्या सुरक्षेमध्ये भर पडणार होती. मात्र देखभाल दुरुस्तीअभावी हे सीसीटिव्ही बंद आहेत. बंद सीसीटिव्हीमुळे पोलीसांना आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण बनले. पिडीत युवती साळवीस्टॉप येथे रिक्षात बसली. त्यावेळी साळवीस्टॉप येथील सीसीटिव्ही बंद होते. सीसीटिव्ही सुरु असते तर आरोपी सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असता आणि पोलीसांनी काही तासांतच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या. प्रशासनाने बसवलेले सीसीटिव्ही बंद असल्यामुळे पोलीसांना लोकसहभागातून बसवलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज घ्यावे लागले आहे. पोलीसांनी चार ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
पिडीत तरुणीच्या शरीरावर काही जखमा आढळल्या आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर पुढील माहिती प्राप्त होणार आहे. हा अहवाल येण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
रत्नागिरीत एका युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आज आम्ही एसआयटीची स्थापना केली आहे. यामध्ये महिला पोलीस निरिक्षक तपास अधिकारी असणार आहेत. दोन महिला उपनिरिक्षक यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी, सायंटिफीक तपास करण्याचा ज्या कर्मचाऱ्यांना अनुभव आहे, त्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत. अनेक लोकांची विचारपूस करण्याचे, अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
– धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी