वाहनात मागे बसणाऱ्यांनाही आता सीट बेल्टची सक्ती, पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवा नियम लागू होणार

कार चालवताना सीट बेल्ट लावणे चालकाला बंधनकारक आहे. जर सीट बेल्ट लावला नसेल तर चालकाला दंड भरावा लागतो, परंतु आता पुढील वर्षापासून कारमधील मागे बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणे बंधनकारक होणार आहे. केंद्र सरकार यासंबंधीचा नवीन कायदा आणणार असून याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाहनांसाठी नवीन नियम आणण्याचे ठरवले आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट रिमाइंडर मिळणार आहे. याचा उद्देश म्हणजे मागे बसलेल्या व्यक्तींनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. सीट बेल्ट लावल्यामुळे दुर्घटनेवेळी मागे बसणाऱ्यास दुखापत होण्याची भीती कमी असते. या नियमांतर्गत विशेष सुरक्षा सुविधा म्हणजेच सीट बेल्ट, नियंत्रण सिस्टम (रेस्ट्रेंट सिस्टम) आणि सीट बेल्ट रिमाइंडरचा वापर करावा लागणार आहे. डिसेंबर 2023 च्या एका अहवालानुसार, 2022 मध्ये रस्ते अपघातात 16 हजार 715 लोकांचा मृत्यू हा केवळ सीट बेल्ट न लावल्यामुळे झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

या वाहनांना नियम लागू

चार लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या कार, 8 हून जास्त प्रवाशांसाठी बनवण्यात आलेल्या प्रवासी बस, 3.5 टन वजनाची वाहने यातील प्रवाशांना 1 एप्रिल 2025 पासून सीट बेल्ट लावावा लागणार आहे. तसेच सर्व वाहनांना सेफ्टी बेल्ट लावणे आवश्यक असणार आहे. त्याचे पालन करणेही गरजेचे असणार आहे.