
शेअर बाजारात प्रोसेस ड्रिव्हन तंत्रज्ञान वापरुन झटपट कमाई करुन देण्याच्या युक्त्या शिकवणारे अवधूत साठे यांच्यावर शेअर बाजार नियंत्रक सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीने साठे यांच्यावर पुढील आदेश देईपर्यंत शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली असून गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे व नफा असे मिळून 601 कोटी रुपये तत्काळ परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीठच्या माध्यमातून साठे हे गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत शिकवत होते. मात्र, साठे यांच्या अकॅडमीने कोणतीही कायदेशीर नोंदणी न करता सल्लागार म्हणून कारभार सुरू केल्याचे सेबीला आढळले. तसेच शेअर बाजार विश्लेषक म्हणूनदेखील मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर सेबीने कारवाई केली आहे. कर्जत येथे साठे यांच्या ट्रेडिंग कंपनीवर छापा मारला होता. आता त्यांना स्वतःच्या किंवा विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्यास सेबीने मनाई केली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद इत्यादी ठिकाणी साठे अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येत होते.


























































