
सामना ऑनलाईन, लंडन
ब्रिटनमध्ये ‘स्टेम सेल्स’च्या मदतीने एका एचआयव्ही रुग्णावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आला आहे. उपचार होऊन 18 महिने झाले आहेत, तेव्हापासून आतापर्यंत या रुग्णाच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सापडलेले नाहीत. यासोबतच एचआयव्हीच्या औषधाचीही गरज पडलेली नाही. असे असले तरीही संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरा झाल्याचे सांगता येणार नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, हिंदुस्थानी वंशाचे वैज्ञानिक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा प्रयोग केला आहे.
जगातील दुसरा रुग्ण एड्समुक्त होणे हे मोठे यश असल्याचे संशोधकांनी सांगितले. लंडनमधील या रुग्णाला स्टेम सेल ट्रान्सप्लांटद्वारे एड्सच्या विषाणूंपासून मुक्त करण्यात आले आहे. याआधी बर्लिन पेंशट नावाने प्रसिद्ध झालेला रुग्ण 2008 मध्ये एड्समुक्त झाला होता. त्यानंतर टिमोथी ब्राऊन ही ओळख त्या माणसाने उघड केली होती. मात्र, लंडनच्या या रुग्णांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. हा रुग्ण 2003 मध्ये एड्सग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. 2012 मध्ये त्याने या संक्रमणाकर उपचार करण्यास सुरुवात केली. तसेच 2012 मध्ये त्याला Hodgkin lymphoma नावाचा कर्करोग झाला. 2016 मध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटद्वारे त्याच्यावर उपचार करण्यात आले.
या रुग्णाकर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना स्टेम सेलचा असा एक असा दाता मिळाला ज्याच्या शरीरात एक दुर्लभ जीन म्युटेशन होता. जो नैसर्गिक पद्धतीने एचआयव्ही विषाणूंकिरोधात प्रतिकारशक्ती वाढवत होता. ही माहिती मिळाल्यावर या दात्याचे स्टेम सेल या रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केल्यास कर्करोगासह त्याचा एड्सचाही इलाज होईल, असा विश्वास डॉक्टरांना वाटला. त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. असा जीन उत्तर युरोपमधील फक्त एक टक्का लोकांमध्ये असतो. असा जीन मिळणे ही दुर्लभ घटना असल्याचे लंडन विद्यापीठातील संशोधक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णांची प्रतिकारक क्षमता आश्चर्यकारकरीत्या बदलली. स्टेम सेल दात्याप्रमाणे रुग्णांच्या शरीरातही एचआयव्ही विषाणूंचा प्रभाव नष्ट झाला. त्यानंतर शरीरातील विषाणू पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करण्यासाठी रुग्णाने स्वेच्छेने एचआयव्हीची औषधे घेणे बंद केले.
साधारणपणे औषधोपचार बंद केल्याकर एचआयव्ही विषाणू तीन आठवडय़ात प्रभाव दाखवण्यास सुरुवात करतात. मात्र, लंडनमधील या रुग्णाने औषधे बंद केल्याकर 18 महिन्यांनंतरही या विषाणूंचा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे तो एड्समुक्त झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. आपण लंडनमधील या रुग्णाला भेटून नाव जाहीर करण्याची विनंती करणार आहोत, असे एड्समुक्त झालेला पहिला रुग्ण टिमोथी ब्राऊन यांनी सांगितले. नाव जाहीर केल्यामुळे एड्सविरोधात लढणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले.
रवींद्र गुप्ता यांचे बहुमोल योगदान
लंडनमध्ये झालेला प्रयोग युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इम्पेरियल कॉलेज लंडन, केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ अशा प्रख्यात इन्स्टिटय़ूटच्या संशोधकांनी केला. संपूर्ण टीमचे नेतृत्व हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता करत होते. ते युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये संशोधक आहेत.

























































