कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या निषेधार्थ मुंबई-महाराष्ट्रात सुरू झालेले आंदोलन आज आणखीनच तीव्र झाले आहे. आजही अनेक रुग्णालयांत आंदोलन करण्यात आले. शिवाय काम बंद आंदोलनामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील ‘ओपीडी’ सेवा कोलमडली असून ऑपरेशनही बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता पालिकेच्या वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘सिक्युरिटी कंट्रोल’ रूम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटत आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करीत ‘मार्ड’ संघटनेने मंगळवारपासून संप पुकारला असून न्यायाची मागणी करण्यात येत आहे. मात्र संपामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. इमर्जन्सी सेवांवरही याचा मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पालिका रुग्णालयांची सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून ‘मार्ड’सोबत आज विशेष चर्चा केली.
यामध्ये प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘सिक्युरिटी कंट्रोल रूम’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन आठवड्यांत मार्डच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. यावेळी उपआयुक्त संजय कुऱ्हाडे, संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय नीलम अंद्राडे, सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच प्रमुख सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण रुग्णालय परिसरावर सीसीटीव्हीची नजर
रुग्णालय परिसर हा पूर्ण सीसीटीव्ही निगराणीखाली असेल याबाबत रुग्णालय अधिष्ठातांनी स्वतः खातरजमा करून घ्यावी. तसेच संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करून तो हाताळण्यासाठी 24 तास व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. या सीसीटीव्ही कव्हरेजच्या स्टोरेज व अतिरिक्त बॅकअप वेगवेगळा राहील यासाठीची व्यवस्था करावी. रुग्णालय, कॅण्टीन, कॅम्पस, कॉमन रूम, हॉस्टेल कॅम्पस, हॉस्टेल कॉमन रूम आदी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या.
सुरक्षेचे ऑडिट, डॉक्टरांनाही सौजन्याचे धडे
रूग्णालय परिसरात नेमण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था ही कार्यक्षम असावी. एखादी घटना किंवा प्रसंग घडल्यानंतर सुरक्षा अधिकारी यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने बजावली, या गोष्टीचे नियमित ऑडिट होणे गरजेचे आहे. एखाद्या घटना किंवा प्रसंगाला हाताळण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) अमलात आणणे गरजेचे आहे. सुरक्षा रक्षकांना कामाच्या ठिकाणी वेळोवेळी रोजच्या कामांमधून अद्ययावत स्वरूपाच्या प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे बांगर यांनी सांगितले. रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देताना सुरक्षा रक्षकांसह कोणताही रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स हे अरेरावी पद्धतीने वागणार नाहीत याचीही खातरजमा रुग्णालय प्रमुखांनी करावी. तसेच आवश्यक रुग्ण कक्षांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध राहील याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या.