निवड समिती बैठकीचे थेट प्रक्षेपण व्हायला हवे! क्रिकेटपटू मनोज तिवारीचा सणसणीत टोला

522

बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मनोज तिवारीने हिंदुस्थानच्या निवड समिती प्रकियेवर शंका व्यक्त करताना म्हटले की, हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण व्हायला हवे. बंद दरवाजामध्ये ही बैठक व्हायला नको, असा सणसणीत टोलाही त्याने यावेळी लगावला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत व्यक्त केले.

बैठकीचे थेट प्रक्षेपण झाल्यास कोणत्या खेळाडूला कोणत्या कामगिरीच्या आधारावर निवडण्यात येते हे साऱ्यांनाच समजेल तसेच निवड प्रकियाही पारदर्शक असेल. यामुळे खेळाडूंचे नुकसान होणार नाही, असे मनोज तिवारी आवर्जून सांगतो. पुढे तो म्हणाला, ज्या खेळाडूंची निवड केली जात नाही, त्याने याबाबत सदस्यांना विचारले असता ते म्हणतात, इतर सदस्यांनी मदत केली नाही. हे कारण पटण्यासारखे नसते. 34 वर्षीय मनोज तिवारीने 12 वन डे वतीन टी-20 सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले.

शतकानंतर 14 सामन्यांत बाहेर बसवले

माझी कारकीर्द जवळून बघितली असेल तर तुम्हाला निश्चित कळेल की, हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये आवडत्या खेळाडूंना संधी दिली जाते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत शतक झळकावल्यानंतर मला 14 लढतींमध्ये बाहेर बसवण्यात आले. या लढती सहा महिन्यांच्या अंतरात खेळवण्यात आल्या. याप्रसंगी मी संघात होतो, पण प्रत्यक्षात अकरा जणांमध्ये संधी दिली नाही. कर्णधार व संघ व्यवस्थापनाचे माझ्याबाबत कोणते मत होते हे आताही मला समजलेले नाही. एवढेच नव्हे तर 2012 सालातील टी-20 वर्ल्ड कपदरम्यान तर नेटमध्येही मला फलंदाजी करायला मिळाली नाही, अशी खंतही मनोज तिवारीने बोलून दाखवली.

विभागानुसार खेळाडूंची निवड होते

मनोज तिवारीने आणखी एका विषयावर दृष्टिक्षेप टाकला. तो म्हणाला, हिंदुस्थानात विभागानुसार खेळाडूंची निवड होते. आंध्रचे एमएसके प्रसाद निवड समितीवर नियुक्त झाल्यानंतर आंध्रच्याच हनुमा विहारीसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर उत्तरेकडील व्यक्तीची निवड समितीवर निवड झाल्यानंतर गुरकिरट सिंग व रिषी धवनला संघात स्थान देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या