सध्याची वेगवान जीवनशैली, स्पर्धा, ताण, नैराश्य आणि भेडसावणाऱ्या चिंता यामुळे जगभरातील 25 टक्के लोकांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर हिंदुस्थानातही अनेक जणांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उद्या (गुरुवारी) मरीन लाईन्स येथील एसएनडीटी विद्यापीठात परिसंवाद आयोजित केला आहे.
कोरोनाकाळानंतर सर्वांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाले. त्यातून चिंता, नैराश्य आणि ताण वाढत गेला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2019 नंतर मानसिक आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली. 2023 मध्ये जगातील 25 टक्के लोकसंख्येला मानसिक आरोग्याचा सामना करावा लागला आहे. 90 टक्के देशांमधील लोकांना मानसिक आरोग्यात बिघाड झाला होता.
या पार्श्वभूमीवर उद्याच्या (10 ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एसएनडीटी विद्यापाठीच्या मनोविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश ठाकरे यांनी पुढाकार घेऊन एसएनडीटी विद्यापीठातील पाटकर हॉलमध्ये उद्या सकाळी 10 ते संध्याकाळ 5 या वेळेत परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये महिंद्र समूहाच्या ‘चिफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर’ कृपा शेट्टी, प्रख्यात मनोचिकित्सक डॉ. हरीश शेट्टी सहभागी होतील. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आजच्या वेगवान व तणावपूर्ण वातावरणात मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याला महत्त्व दिल्यास व्यक्ती आणि संस्था विकासाच्या एका वेगळय़ा उंचीवर नेऊ शकतो.
n डॉ. नीलेश ठाकरे, मनोविज्ञान विभागप्रमुख एसएनडीटी विद्यापीठ