Akola news – प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचे निधन

अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे निधन झाले आहे. हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी अकोला तालुक्यातील मोहोळ गावात प्राणघात हल्ला झाला होता. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मंगळवारी दुपारी हिदायत पटेल हे मोहोळ गावातील मशिदीत नमाजासाठी गेले होते. नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला होता. राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल याने हिदायत पटेल यांच्या मानेवर आणि पोटावर चाकून वार केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते.

गंभीर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना गावातील लोकांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत ही हत्या झाल्याने खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिदायत पटले यांचा अल्प परिचय

– हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते.
– अकोल्यातील आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.
– पटेल यांनी 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती.
– 2014 मध्ये त्यांना दुसऱ्या तर 2019 मध्ये तिसऱ्या पसंतीची मतं मिळाली होती.
– अकोला जिल्ह्यातील ते मोठे सहकार नेते होते आणि 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते.
– अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते.
– 35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्त्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्याचे संचालक होते.